नांदेड(प्रतिनिधी)-आर्थिक परिस्थितीमुळे खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थींनींना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी अडचण येत होती. त्यासाठी राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ही सोय केली आहे. आता या पुढे अशा विद्याथ्यार्र्ंना शिष्यवृत्ती सोय महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे. या शासन निर्णयावर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी नितीन घिरटकर यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
अनेक पाल्यांना आपल्या आर्थिक अडचणीमुळे परदेशात शिक्षण घेणे हा अवघड विषय आहे. शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून या परदेशातील शिक्षणासाठी शिष्यृवत्ती योजना लागू करण्यात आली. पण पुढील दोन वर्षात कोविड-19 च्या प्रभावामुळे ही योजना राबविण्यात आली नाही. आता कांही सुधारणांसह शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.
गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजुर करणे या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लक्ष रुपये करण्यात आली आहे. अशा विद्यार्थ्यांनी सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात परदेशी विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ही योजना सन 2021-22 या वर्षाकरीता मान्य झाली आहे. त्यांचे पहिले वर्ष वगळता पुढील अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती त्यांना देय ठरेल.
योजनेकरीता विहित करण्यात आलेल्या अटींच्या आधीन राहुन 20 प्रवेश संख्या शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता संचालक तंत्र शिक्षण यांच्या मार्फत राबविण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाने आपला हा शासन निर्णय संकेतांक क्रमांक 202109071100192808 प्रमाणे शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.
