नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली शहराच्या कुरेशी गल्लीमध्ये झालेल्या भांडण प्रकरणी बिलोली पोलीसांनी 23 जणांविरुध्द भारतीय दंड संहितेसह इतर कायद्यानुसार 15 कलमे जोडून गुन्हा दाखल केला आहे. काल दि.6 सप्टेंबर रोजी पोळा सण होता. या वेळेस बिलोली शहरातील कुरेशी गल्लीमध्ये पोलीसांसमक्ष हे भांडण झाले म्हणून या प्रकरणाची तक्रार सहाय्यक पोलीस निरिक्षकाने दिली आहे. याप्रकरणात बिलोली पोलीसांनी पाच जणांना अटक केली असून बिलोलीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या पाच जणांना तीन दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.
बिलोलीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रामदास माणिकराव केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 सप्टेंबर रोजी पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांनी त्यांना फोन केला आणि कुरेशी गल्लीमध्ये गोमास विक्रीची माहिती आली आहे. तेथे जावून तुम्ही कायदेशीर कार्यवाही करा असे सांगितल्याने मी व माझ्या सोबत पोलीस अंमलदार मुद्देमवार, सोनकांबळे आदींसह तेथे गेलो. त्यावेळेस आज पोळा सण असतांना तुम्ही मास विक्री करत आहात असे गजानन पांचाळ ओरडून सांगत होता आणि लोकांना भडकवून देत होता. दुसरीकडे कुरेशी लोकांपैकी कांही जण गजानन पांचाळला उद्देशून तु हमको बहोत तंग कर रहा है, तेरा नाटक बहुत हुवा, तेरे पैर काटना पडता असे ओरडून लोकांना भडकवून देत होते. यात कांही जण कुरेशींच्या घरात जावून मास शोधत होते. या सर्व घटनाक्रमामुळे तेथे अशांतता निर्माण झाली. आम्ही दोन्ही लोकांना रोखत असतांना सुध्दा ते थांबत नव्हते. या गोंधळात गजानन पांचाळ, ऋषीकेश गोगरोड, श्रीकांत यांना मार लागला आहे असे या तक्रारीत लिहिले आहे.
या तक्रारीत नरेश तोडलवार, गजानन पांचाळ, ऋषीकेश गोगरोड, अर्जुन कसोड, सचिन गोगरोड, श्रीकांत राम गादगे, लिंबुराम ठकरोड, साईनाथ शंकपाळे, राहुल समुद्रे, लक्ष्मण दनलोड, मुकेश जोशी, गणेश मेहत्रे, कलीम कुरेशी, नसीर कुरेशी, आसीफ कुरेशी, बाबा कुरेशी, अलिम कुरेशी, कलीम कुरेशी, असलम कुरेशी, हमीद अब्दुल कुरेशी, अब्दुल हक कुरेशी, अजहर कुरेशी, अजीम कुरेशी यांच्यासह इतर 15 जणांचा जमाव सामिल होता असे लिहिले आहे. बिलोली पोलीसांनी या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेचे कलम 353, 332, 352, 109, 323, 504, 506, 324, 326, 143, 147, 149, 160, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 आणि फौजदारी कायदा सुधारणा कलम 7 अशी 15 कलमे जोडली आहेत. या गुन्ह्याचा तपास बिलोलीचे पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांच्याकडे आहे. पोलीसांनी 5 जणांना अटक केली आहे. बिलोलीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पकडलेल्या 5 जणांना 0000 दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.
