क्राईम

दोन दरोडेखोरांना दोन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-दोन दरोडेखोरांनी एका 18 वर्षीय युवकाला लुटल्यानंतर दीड तासात त्या दोन दरोडेखोरांना जेरबंद करणाऱ्या लिंबगाव पोलीसांनी आज दि.7 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.आर.बडवे यांनी या दोघांना 9 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
बाचोटी ता.कंधार येथील शुध्दोधन मुकूंद वाघमारे हे सध्या सरकारी दवाखान विष्णुपूरी येथील शासकीय निवासस्थानात राहतात. 6 सप्टेंबर रोजी ते आपल्या मोटारसायकल क्रमांक एम.एच.26 बी.यु.9446 वर बसून मामाच्या गावाकडे पुर्णा येथे जात असतांना सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास दोन जणांनी त्यांची मोटारसायकल अडवून कत्तीचा धाक दाखवून, त्याच्या अंगावर मिर्चीपुड टाकून 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल घेवून पळून जात असतांना पोलीस पोहचले. पोलीस पाठलाग करत आहेत. म्हणून दरोडेखोरांनी पोलीसांना सुध्दा कत्तीचा धाक दाखवला. पण पोलीस ते पोलीसच त्यांनी त्या दोन्ही दरोडेखोरांना जेरबंद केले. पकडलेल्या दरोडेखोरांची नावे शेख अकर शेख गौस (22), शेख अफररोज शेख अफसर (29) अशी आहेत. त्यांच्याकडून चोरलेला मोबाईल, कत्ती, चाकू, मिर्ची पावडर असे साहित्य जप्त केले आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक अमृता केंद्रे यांच्याकडे देण्यात आला आहे.
पोलीस उपनिरिक्षक अमृता केंद्रे आणि पोलीस अंमलदार पेद्देवाड, खंडागळे, निवृत्ती रामबैनवाड यांनी पकडलेल्या शेख अफरोज आणि शेख अकबरला न्यायालयात हजर केले. पोलीसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार शेख अकर शेख गौस विरुध्द पोलीस ठाणे सी.टी.कौतवाली अकोला, पोलीस ठाणे किनवट येथे आणि वजिराबाद पोलीस ठाणे नांदेड येथे विविध गुन्हे दाखल आहेत. याबाबत सुध्दा तपास करणे आहे म्हणून या दोघांना पोलीस कोठडी द्यावी. असे सादरीकरण सरकारी वकील ऍड. मोहम्मद रजियोद्दीन यांनी सादर केले. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एस.आर.बडवे यांनी या दोघांना दोन दिवस अर्थात 9 सप्टेंबर 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *