नांदेड(प्रतिनिधी)-अस म्हणतात, “पोळा पाऊस झाला भोळा’ पण यंदा पावसाने पोळ्याच्या दिवशीपासून पुन्हा एकदा जोरदार सरी आणत सार्वजनिक माणसाच्या जीवनात वर्दळ निर्माण केली आहे. शहरातील संत दासगणु पुलावरून पाणी वाहायला लागले आहे. पावसा हो रे बाबा भोळा असा आर्जव सर्वसामान्य माणुस करत आहे.
वेध शाळेने सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा मुसळधार, अतिमुसळधार पर्जन्यवृष्टी होणार असे भाकित केले होते. ते सत्य ठरले. जुनी माणसे सांगायची पोळा आणि पाऊस झाला भोळा पण यंदा पाऊस भोळा होण्याची कांहीच चिन्हे आज तरी दिसत नाहीत. 4 सप्टेंबर पासून पावसाची सुरूवात झालेली आहे. काल दि.6 सप्टेंबर ही भाद्रपद महिन्याची अमावस्या या दिवशी साजरा होणारा पोळा सण पुर्ण झाला की, पाऊस थांबतो असे होत असे. पण निसर्गात झालेल्या बदलांमुळे यंदा पावसाने दडी मारणे तर सोडाच पण गैर हजेरी सुध्दा दाखवली नाही. त्यामुळे आता बहुतांश ठिकाणी खरीप पिकांचे नुकसान दुसऱ्यांदा झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला. शेतकरी अडचणीत आला की, भारतीय अर्थ व्यवस्था अडचणीत येते. कोरोना महामारीने त्रास दिलाच आता निसर्गामुळे नुकसान सुरू झाले आहे. पण कोणत्याही परिस्थितीत जगावेच लागते. या अनुरूप सर्व सामान्य माणुस आपले जीवन जगत आहे.
काल दि.6 सप्टेंबर रोजी विष्णुपूरी धरणातून पाणी विसर्गाची सुरूवात झाली. पाण्याचा वेग आणि पुढे जाण्याची गती ही पावसाळ्यात मंदावलेली असते. त्यानुसार पाण्याचा फुगवटा होत आहे. नांदेड शहरातील नदीच्या पाण्याची धोकादायक पातळी 354 मिटर आहे. ती आता थोडीशीच दुर राहिलेली आहे. आजही पाऊस बंद नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात हा पाण्याचा फुगवटा अधिक वाढेलच. नांदेड शहरात नदीकाठी राहणाऱ्या परिसरामध्ये आता पावसाचे पाणी घरात आले आहे. नांदेड शहरातून उत्तर ते दक्षीणकडे जाणाऱ्या पुलांमध्ये संत दासगणु पुल नावघाट आहे. या पुलावरून पाणी वाहायला लागले आहे. प्रशासनाने दक्षता म्हणून या पुलावरी वाहतुक बंद केली आहे. अनेक ठिकाणी नदीकाठी जीवरक्षक तयार आहेत. जुना मोंढा येथील रामघाट परिसरात शनिदेवाच्या पायरीजवळ पाणी पोहचले आहे. गोवर्धनघाट पुलावरील स्मशानभुमि अर्धी पाण्यात गेली आहे. त्यामुळे आज कोणाचा मृत्यू झाला तर त्याला जाळणे अवघड झाले आहे.
निसर्गात झालेला हा बदल 60 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेली मंडळी अत्यंत चांगल्यारितीने सांगतात. त्यांच्या युवा काळात पोळ्यानंतर पाऊस कधीच पडला नाही आणि पडलाच तर तो कधीच नुकसानदायक ठरला नाही. यंदा पावसाने दाखवलेला आपला दम सर्वसामान्य नागरीकांच्या जीवनात मोठा बदल घडवत आहे. प्रत्येकाने पावसाच्या पाण्याची दक्षता घेत आपण सुखरूप राहू यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन आम्ही सुध्दा करतो आहोत.