नांदेड(प्रतिनिधी)-लोहा ते अहमदपुर रस्त्यावर एका ट्रकमधून बायोडिझेलची विक्री होत आहे. यावरुन लोहा तहसील कार्यालयातील अव्वल कारकूनाने तब्बल सहा दिवसानंतर दिलेल्या तक्रारीनुसार माळाकोळी पोलीसांनी ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
तहसील कार्यालय लोहा येथील पुरवठा विभागाचे अव्वल कारकून गणेश लक्ष्मण मोहिती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 वाजेच्यासुमारास ट्रक क्रमांक एम.एच.21 डी.8648 चा ट्रक चालक आपल्या ट्रकमधील बायोडिझेल विक्री करत होता. ट्रकमधील बायोडिझेल 2 लाखांचे ट्रक आणि त्यातील मशीन 7 लाखांची असा 9 लाखांचा मुद्देमाल पकडण्यात आला आहे. 28 ऑगस्ट रोजी घडलेल्या गुन्ह्याची तक्रार तहसील कार्यालयाने तब्बल 6 दिवसांनतर 2 सप्टेंबर रोजी दिली आहे. त्यानुसार माळाकोळी पोलीसांनी बायोडिझेल विक्री करणाऱ्या ट्रक चालकाविरुध्द गुन्हा क्रमांक 153/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 285 आणि अत्यावश्यक वस्तु विक्री कायद्याच्या कलम 3 आणि 7 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक माणिक डोके हे करीत आहेत.
