नांदेड(प्रतिनिधी)-नसरतपुर व हस्सापूर या गावांना नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्द वाढी प्रस्तावातून वगळण्यासाठीचे निवेदन शिवसेनेचे तालुका संघटक नवनाथ काकडे यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्द वाढीचा प्रस्ताव सध्या प्रलंबित आहे. नवनाथ काकडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत 15 ते 20 वर्षापुर्वी वसरणी, तरोडा, कौठा, सांगवी या गावांचा समावेश करण्यात आला होता. तरीपण या गावांमध्ये अद्याप महानगरपालिकेच्या माध्यमातून मलनिस्सारण वाहिनी, पथदिवे, मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, शाळा, रुग्णालय आदी कोणत्याच सुविधा पुरविल्या गेल्या नाहीत. नांदेड शहराला जोडून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात महानगरपालिकेला यश आले नाही. महानगरपालिका दर तीन दिवसाला जनतेला पाणी पुरवते. यावरुन महानगरपालिकेचा ढिसाळ कामकाजाचा नमुना दिसतो. सोबतच हद्द वाढीचा प्रस्ताव नांदेडच्या नागरीकांवर लादला जात आहे. तरी नगरविकास मंत्र्यांनी हस्सापूर व नसरतपुर या गावांचा समावेश महानगरपालिकेच्या प्रस्तावातून वगळावा अशी विनंती नवनाथ काकडे यांनी केली आहे.
