नांदेड

दत्तनगर येथील केअर हॉस्पीटलच्या चुकीने बालकाचा मृत्यू झाला

प्रहार संघटनेचे कार्यवाही करून दवाखाना कायम बंद करण्याचे निवेदन
नांदेड(प्रतिनिधी)-दत्तनगर येथील केअर हॉस्पीटलने चुकीचा उपचार करून 10 वर्षीय बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरले म्हणून त्या दवाखान्यातील डॉ.संदीप बोकारे व संबंधीत त्यांच्या सहकाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्याची मागणी प्रहार संघटनेचे महानगरप्रमुख प्रितपालसिंघ शाहु यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा शल्यचिकित्स नांदेड, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि राज्यमंत्री ओमप्रकाश कडू आणि पोलीस अधिक्षक नांदेड यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, दत्तनगरमधील केअर हॉस्पीटलमध्ये सरदार दिलबागसिंघ गुलाबसिंघ कंधारवाले यांचा 10 वर्षीय बालक जसराजसिंघ याला ताप आली म्हणून 19 ऑगस्ट रोजी ऍडमिट केले होते. उपचार सुरू असतांना बालकाची तब्येत 21 ऑगस्ट रोजी जास्त बिघडली. तेंव्हा डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचार करण्याऐवजी त्या बालकाला हैद्राबाद येथे हलविण्याची घाई केली आणि थोड्याच वेळात बालकाचा मृत्यू झाला.
बालकास 19 ऑगस्ट रोजी ऍडमिट केले तेंव्हा तपासणीचे अहवाल डॉ.बोकारे यांना दाखविण्यात आले होते. तेंव्हा त्यांनी बालकाची परिस्थिती काळजी करण्यासारखी नाही असे सांगितले. पण डेंगू असल्याने सर्वसाधारण कक्षात त्या बालकाला ठेवले. 21 ऑगस्ट रोजी सोनोग्राफी करण्यासाठी नेतांना बालक कोणत्याही आधाराशिवाय स्वत: चालत गेला आणि परत आला. त्यानंतर दुपारी 1.30 ते 1.45 दरम्यान डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या बालकाला एक इंजेक्शन दिले आणि त्याची तब्येत जास्तच बिघडली. त्यावेळी त्याला ऑक्सिजन लावत तब्येत जास्त बिघडली आहे. त्यामुळे याला हैद्राबादला घेवून जा असे सांगितले. एका तासातच बालकाचा मृत्यू झाला. घडलेल्या प्रकाराची विचारणा डॉ.संदीप बोकारेकडे केली तेंव्हा त्यांनी पोलीसांना पाचारण केले. जसराजसिंघ कंधारवाले या बालकाचा मृत्यू डॉक्टर व त्यांच्या सहकारी यांच्या हलगर्जीपणामुळे घडला आहे. त्यांच्यावर कार्यवाही करून दवाखाना कायम बंद करावा अशी मागणी केली आहे. या निवेदनावर विठ्ठलराव देशमुख, अजय हनमंते, मल्लीकार्जुन चाकोते, दिलबागसिंघ कंधारवाले आणि राजेश तलवारे यांच्यापण स्वाक्षऱ्या आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.