

चोरीच्या एकूण घटनांमध्ये 3 लाख 68 हजार 630 रुपयांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरूजी चौकात तीन शटर फोडून चोरट्यांनी 2 लाख 7 हजार 630 रुपयांची विदेशी दारु चोरून नेली आहे. सोबतच औद्योगिक वसाहत शिवाजीनगर भागात एक घर फोडण्यात आले आहे. दत्तनगर नांदेड येथे एका घरातून टी.व्ही आणि दोन मोबाईल चोरीला गेले आहेत. भगतसिंघ चौक येथून एक मोबाईल चोरीला गेला आहे. भोपाळवाडी ता.कंधार येथून एक दुचाकी चोरीला गेली आहे. देगलूर येथे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या एकाला पकडण्यात आले आहे. चोरींच्या घटनांमध्ये एकूण 3 लाख 68 हजार 630 रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
नमस्कार चौकातील हॉटेल वॉटर लिली बार ऍन्ड रेस्टॉरंट, कमल बार ऍन्ड रेस्टॉरंट तसेच शिवकृपा कृषी केंद्र असे तीन दुकान फोडून चोरट्यांनी वेगवेगळ्या कंपनीचे विदेशी दारू, सीसीटीव्हीचा व्हिडीआर असा 2 लाख 7 हजार 630 रुपयांचा ऐवज चोरला आहे. यात लिली बार ऍन्ड रेस्टॉरंटचे मेनेजर राजतिलकसिंह प्रभुसिंह हजारी आहेत, कमल बार ऍन्ड रेस्टॉरंटचे मालक अतिशकुमार शंकरप्रसाद जयस्वाल हे आहेत.तसेच शिवकृपा कृषी केंद्राचे मालक शाम साहेबराव कल्याणकर हे आहेत. या तीन चोरीच्या घटनांची तक्रारी राजतिलकसिंह हजारी यांनी दिली आहे.भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक रामभाऊ जाधव अधिक तपास करीत आहेत.
रतनलाल जियालाल कुरील यांनी औद्योगिक वसाहतीतील पोरवाल ऑईलमिलच्या बाजूस असलेले त्यांचे दुकान बंद करून गेल्यानंतर त्यातील 40 हजार रुपये रोख आणि 1 ग्रॅम सोन्याचे मनी 30 हजार रुपये किंमतीचे चोरट्यांनी दुकान फोडून घेवून केले आहेत. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
विपुल संतोष धमलवाड रा.दत्तनगर नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेच्यासुमारास त्यांच्या घरात प्रवेश करून कोणी तरी त्यांच्या घरातील टी.व्ही. दोन मोबाईल असा 40 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.
शमीम राज निसार अहेमद हे 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता भगतसिंघ चौकाजवळ हातगाड्यावर फळे खरेदी करत असतांना त्यांच्या खिशातील 25 हजारांचा मोबाईल कोणी तरी चोरला आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक कृष्णा काळे अधिक तपास करीत आहेत.
बालाजी बळीराम तुप्पेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 ऑगस्टच्या पहाटे 4 ते 6 अशा दोन तासाच्या वेळेत भोपाळवाडी ता.कंधार येथून त्यांची 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी क्रमांक एम.एच.26 डी.यु.2024 ही चोरीला गेली आहे. उस्माननगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार श्रीमंगले हे अधिक तपास करीत आहेत.
रावसाहेब गणपतराव डुकरे रा.कुशावाडी ता.देगलूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.29 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्यासुमारास त्यांच्या घराच्या भिंतीवरून, पायऱ्यांवरून घरात प्रवेश करून एकाने चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पत्नीने आरडा ओरड केल्याने चोर पळून जात असतांना त्याला पकडले. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार पल्लेवाड हे करीत आहेत.