नांदेड

गणवेशात पोलीस अंमलदाराचा कॉलर धरा आणि दाखल होईल फक्त अदखल पात्र गुन्हा

नांदेड(प्रतिनिधी)-एका नामावंत, गुणवंत पोलीस उपनिरिक्षकाच्या मेहुण्याने 27 ऑगस्ट रोजी वाहतुक शाखेच्या एक पोलीस अंमलदार गणवेशात असतांना त्याचा कॉलर पकडला. पोलीस ठाणे वजिराबादमध्ये आणल्यानंतर सुध्दा त्याने पोलीसाचा कॉलर पकडला. हा पोलीस उपनिरिक्षकाचा मेहुणा ऍटो चालक आहे. बिचाऱ्या त्या वाहतुक पोलीस अंमलदाराची व्यथा व्यथाच राहिली आणि पोलीस उपनिरिक्षकाच्या मेहुण्यावर गुन्हा दाखल होण्याऐवजी त्याच्यावर अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. रस्त्यावर वाहतुकीसाठी नेहमीच अडचणी करणारे ऍटो चालक आणि त्यात पोलीस उपनिरिक्षकाचा मेहुणा या दोन कारणामुळे बहुदा वाहतुक पोलीस अंमलदराराला झालेल्या व्यथेचे पडसाद फक्त आपल्या आश्रुंद्वारे व्यक्त करावे लागले.
27 ऑगस्ट रोजी वाहतुक शाखेतील रायडर पोलीस अंमलदार गस्त करत असतांना बसस्थानकाजवळच्या उड्डाणपुलावर एक ऍटो चालक बेशीस्तीत ऍटो उभा करून थांबलेला होता. त्याला ऍटो रिक्षा बाजूला घेण्याची सुचना वाहतुक शाखेच्या पोलीस अंमलदाराने केली तेंव्हा तुला काय प्रॉब्लेम आहे अशी विचारणा करून तो ऍटो चालक खाली उतरला आणि थेट गणवेशातील वाहतुक पोलीस अंमलदाराची कॉलर धरली. असंख्य लोक जमले. जमलेले अनेक लोक त्या ऍटो चालकाला पोलीस अंमलदाराची गणवेशातील कॉलर सोडण्यास सांगत होते. पण तो ऐकणार कसा त्याचा एक मेहुणा नामवंत, गुणवंत पोलीस उपनिरिक्षक आहे आणि याचा तो प्रचार करत होता. पोलीस उपनिरिक्षकाचे नाव ऐकल्यावर असे वाटायला लागले की, करोडपती असलेल्या पोलीस उपनिरिक्षकाचा मेहुणा ऍटो चालवतो काय? यावर विश्र्वास बसला नाही.
यानंतर पोलीसांनी त्या ऍटो चालकाला वजिराबाद पोलीस ठाण्यात आणले. त्या ठिकाणी घडलेला प्रकार तर रस्त्यापेक्षा जास्त भयंकर होता. पोलीस ठाण्यात सुध्दा त्या ऍटो चालकाने वाहतुक शाखेच्या अंमलदाराची कॉलर पुन्हा धरली. तेंव्हा वजिराबाद येथील एका दबंग पोलीस उपनिरिक्षकाने यावर कडक भुमिका घेतली. पण सध्या नांदेड जिल्ह्यातील पोलीस परिस्थितीनुसार वाहतुक शाखेत पोलीस निरिक्षक नाही. म्हणून त्या पोलीस अंमलदारांच्या व्यथांना कोणीच ऐेकले नाही. वाहतुक शाखेच्या पोलीस अंमलदाराने दिलेल्या तक्रारीवरुन महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110/117 नुसार अ दखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे म्हणे.
वाहतुक शाखेचा पोलीस अंमलदार आपल्या व्यथांना आपल्याच अश्रुंदारे स्वत:कडेच व्यक्त करत होता आणि आपल्याशीच बोलत होता. आपल्या व्यथा आपलेच अधिकारी ऐकणार नाहीत अशा परिस्थितीत त्या पोलीस अंमलदाराची अश्रुंद्वारे आपल्या व्यथा व्यक्त करण्याची ही पध्दत पटली नाही.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.