क्राईम

डॉक्टर्स लेनमध्ये मेडीकल दुकान फोडून 1 लाख 70 हजार रूपये चोरले

चोरीच्या एकूण घटनांमध्ये 3 लाख 49 हजारांचा ऐवज लंपास
नांदेड (प्रतिनिधी)- वजिराबाद भागातील डॉक्टर्स लेन येथे एक मेडिकल दुकान फोडून चोरट्यांनी 1 लाख 70 हजार रूपये रोख रक्कम चोरली आहे. वाजेगाव नांदेड, संजीवनी हॉस्पीटल दत्तनगर नांदेड आणि किनवट शहरातील गोकुंदा येथून 1 लाख 30 हजार रूपये किंमतीच्या तीन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. मुदखेड येथे एका चारचाकी वाहनातून 24 हजार रूपये किंमतीच्या बॅटऱ्या चोरण्यात आल्या आहेत. लाबरा ता. लोहा या गावातून एक मोबाईल चोरीला गेला आहे. तसेच वाळकी ता. लोहा येथून विहीरीवरील मोटार चोरीला गेली आहे. या सर्व चोरी प्रकारांमध्ये 3 लाख 49 हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
तोष्णीवाल मेडिकल या दुकानाचे मालक अनिलकुमार राधाकृष्ण तोष्णीवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 ऑगस्टच्या रात्री 8.30 वाजता ते आपले मेडिकल दुकान बंद करून घरी गेले. 27 ऑगस्टच्या सकाळी 7 वाजता त्यांना मेडिकल दुकान फोडल्याची माहिती मिळाली. तपासणी केली असता कोणी तरी चोरट्यांनी शटर लॉक तोडून दुकानात प्रवेश केला आणि 1 लाख 70 हजार रूपये रोख रक्कम चोरून नेली. वजिराबाद पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शेख अब्दुल रब अधिक तपास करीत आहेत.
शेख सद्दाम शेख इब्राहीम यांची 60 हजार रूपये किंमतीची दुचाकी गाडी क्र. एम.एच. 26 बी.एल. 8227 ही वाजेगाव येथून 27 ऑगस्टच्या दुपारी 2 वाजेच्या सुमारास चोरीला गेली. नांदेड ग्रामीण पोलिसांना हा गुन्हा दाखल केला, पोलीस अंमलदार कदम अधिक तपास करीत आहेत.
भागवत दिगंबर सुर्यवंशी यांची 40 हजार रूपये किंमतीची गाडी क्र्र. एम.एच. 27 बी.पी. 7838 ही 23 ऑगस्टच्या दुपारी संजीवनी हॉस्पीटल समोरून चोरीला गेली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार गायकवाड  अधिक तपास करीत आहेत.
सय्यद इसरार सय्यद निसार यांची 30 हजार रूपये किंमतीची दुचाकी गाडी क्र. एम.एच. 26 बी.पी. 7514 ही 25 ऑगस्टच्या दुपारी 12 ते 2 या वेळेत गोकुंदा किनवट येथील एका झेरॉक्स दुकानासमोरून चोरीला गेली आहे. किनवट पोलिसांना हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार चौधरी अधिक तपास करीत आहेत.
लाबरा ता. लोहा येथील तानाजी नागोराव घोरबांड हे 7 ऑगस्ट रोजी आपल्या घरासमोरील अंगणातील बाजेवर झोपले होते. 8 ऑगस्टच्या पहाटे 5 वाजेदरम्यान त्यांचा 13 हजार 800 रूपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेला. उस्माननगर पोलिसांना हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार पवार करीत आहेत.
एकनाथ विठ्ठल बत्तलवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 ऑगस्टच्या दुपारी 1 वाजेच्या सुमारास ब्राम्हणवाड ता. मुदखेड येथे त्यांच्या शेतात टिप्पर क्र. एम.एच. 14 ए.एस. 7752 आणि एम.एच. 26 एच. 8066 उभे केलेले होते. या दोन टिप्पर गाड्यांमधील दोन बॅटऱ्या 24 हजार रूपये किंमतीच्या कोणीतरी चोरून नेल्या आहेत. मुदखेड पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार व्ही.पी. आलेवाड अधिक तपास करीत आहेत.
दिगंबर मुंजाजी हरणावळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 ऑगस्टच्या सायंकाळी 5 ते 26 ऑगस्टच्या पहाटे 4 वाजेदरम्यान मौ. वाळकी बु. ता. लोहा येथील त्यांच्या शेतातून 3 अश्वशक्तीची एक विद्युत मोटार व पाईप असा 11 हजार 200 रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. उस्माननगर पोलिसांना हा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस उपनिरीक्षक केंद्रे अधिक तपास करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.