क्राईम

दहा वर्षीय बालिकेवर अन्याय करणाऱ्या 24 वर्षीय युवकाला 5 वर्ष सक्तमजुरी

नांदेड(प्रतिनिधी)- एका दहा वर्षीय बालिकेला लग्न-लग्न खेळू अशी हुल देवून तिच्यावर अत्याचार करण्याच्या तयारीत असलेल्या 24 वर्षीय व्यक्तीला विशेष कोर्टाचे न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी 5 वर्ष सक्तमजुरी आणि 4 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणातील पिडीत बालिका न्यायालयासमक्ष बोलतांना आरोपीच्या नावासमोर मामा असा उल्लेख करत होती.
पोलीस ठाणे सिंदखेडच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार दि.28 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 11 वाजता त्यांची 10 वर्षीय पुतणी शेळ्या खांडात सोडून आली. त्यानंतर तिच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या श्रीकांत राजाराम नवलकोंडावार (24) याने त्या 10 वर्षीय बालिकेला सागर पुड्या आणण्यासाठी पाठवले. इकडे आपली पुतणी लवकर घरी आली नाही म्हणून तिचा काका श्रीकांत नवलकोंडावारच्या घरी गेला. दार ढकलून काकाने आत पाहिले ते आम्ही लिहिण्याची आमची ताकत नाही. पण ही सर्व हकीकत गुन्हा क्रमांक 94/2017 च्या पोलीस प्राथमिकीमध्ये लिहिलेली आहे. त्यानंतर काकाने आपल्या पुतणीला घरी आणले आणि श्रीकांतने केलेला घटनाक्रम त्याचे वडील राजाराम यांना सांगितले. याबाबत सिंदखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सिंदखेड पोलीसांनी गुन्हा क्रमांक 94/2017 भारतीय दंडसंहितेच्या कलम 376 आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यातील कलमेनुसार गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याचा तपास पुर्ण करून सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक जयसिंह ठाकूर यांनी दहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या श्रीकांत नवलकोंडावार विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयात या विशेष पोक्सो प्रकरणावर खटला क्रमांक 43/2017 नमुद करण्यात आला. न्यायालयात पिढीत दहा वर्षाच्या बालिकेसह एकूण 9 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले.या प्रकरणात आपली साक्ष देतांना पिडीत दहा वर्षीय बालिकेने आरोपीचा उल्लेख करतांना श्रीकांत मामा असे सांगितलेले आहे. सुरूवातीला हे प्रकरण सरकार पक्षाच्यावतीने ऍड. यादव तळेगावकर यांनी हाताळले. पुढे हा खटला सरकारी वकील ऍड. एम.ए.बत्तुल्ला(डांगे पाटील) यांनी मांडली. प्रकरणातील साक्षी पुराव्यांच्या आधारे न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी या खटल्याचा निकाल दिला.
निकालात कलम 376 सह पोक्सो कायद्याच्या कलम 5,6 आणि 11 नुसार पाच वर्ष सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये दंड तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 5(एम) सह कलम 18 नुसार 5 वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या दोन्ही शिक्षा त्याला सोबत भोगायच्या आहेत. सन 2017 मध्ये त्याला अटक झाल्यानंतर आजपर्यंत तो तुरूंगातच आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सिंदखेडचे पोलीस अंमलदार दिलीपसिंघ मल्ली यांनी पाहिले.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *