नांदेड महाराष्ट्र

2022 च्या महानगरपालिका निवडणुका एक सदस्यीय पध्दतीनुसार होणार

कच्चा प्रभाग रचना आराखडा तयार करण्याच्या सुचना
नांदेड(प्रतिनिधी)-जानेवारी 2022 मध्ये महानगरपालिकांची मुदत पुर्ण होत आहे. तेथे आता प्रभागाऐवजी वार्ड निहाय निवडणुका होणार आहेत. यासाठी प्रारुप कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणुक आयोगाने दिले आहेत. या आदेशावर उपायुक्त अविनाश सणस यांची स्वाक्षरी आहे. महानगरपालिकेत एक सदस्य प्रभाग रचना करतांना गोपनियता न राखणे, नियमांचे काटेकोर पालन न होणे अशा विषयांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सन 2022 मध्ये बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महानगरपालिकांच्या नवीन निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणुक आयोगाने जारी केलेल्या सुचनेनुसार महानगरपालिकेची मुदत संपण्यापुर्वी नवीन सार्वत्रिक निवडणुका होणे बंधनकार आहे.
शासनाने 31 डिसेंबर 2019 रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे बहुसदस्यीय प्रभाग ऐवजी एक सदस्यीय प्रभाग पध्दती लागू केली आहे. यामुळे प्रत्येक प्रभागात एकच सदस्य असेल. त्यासाठी सन 2011 ची लोकसंख्या विचारात घेवून प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करावा. प्रभाग प्रारुप आराखडा तयार करतांना त्यातील नवीन भौगोलिक बदल विचारात घ्यावे. हा आराखडा तयार करण्याची कार्यवाही 27 ऑगस्ट 2021 पासून सुरू करण्यात यावी. यामध्ये प्रभाग रचना करतांना त्यात गोपनियता असावी, नियमांचे काटेकोर पालन व्हावे. त्यावर येणाऱ्या हरकती लक्षात घेवून कच्चा प्रारुप आराखडा यथा योग्यवेळेत तयार करून निवडणुक आयोगाला पाठवायचा आहे.
प्रभाग रचना करतांना महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या भागीले महानगरपालिकेची एकूण सदस्य लोकसंख्या या सुत्रानुसार प्रभागाची सरासरी लोकसंख्या निश्चित करावी. सरासरी लोकसंख्येपेक्षा 10 टक्के कमी अधिक मर्यादा ठेवता येईल. ही मर्यादा कमाल आणि किमान पेक्षा जास्त होत असेल तर त्याचे कारण प्रभाग रचनेच्या प्रस्तावात नमुद करावे. प्रभाग रचना करतांना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरूवात करावी. उत्तरेकडून इशान्य, त्यानंतर पुर्व, त्यानंतर पश्चिम आणि शेवटी दक्षीण अशा प्रमाणे प्रभाग रचना व्हावी. प्रभागांना क्रमांकही त्याच पध्दतीने द्यावा. प्रभांगामध्ये भौगोलिक सलगता राहिल याची सुध्दा काळजी घ्यावी. प्रभाग रचना करतांना कोणालाही शंका घेण्यास वाव मिळणार नाही याचीही दक्षता घेण्यास सांगितले आहे.
प्रभागांची रचना करतांना वस्त्यांचे विभाजन होणार नाही याची दक्षता घ्यावी. अनुसूचित अनुसूचित जमाती यांच्या वस्त्यांचे शक्यतोवर विभाजन होणार नाही असे या आदेशात लिहिले आहे. नागरीकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा त्या प्रभागत त्यांना सहज मिळतील याचाही विचार करा असे म्हटले आहे. प्रभागातील मुलांकरीता, शाळा, मैदाने त्याच प्रभागात मिळावीत. प्रभाग तयार करतांना प्रगणक  गट शक्य तो फोडू  नये प्रभाग तयार करतांना 2011 मध्ये झालेली लोकसंख्या विचारात घ्यावी. प्रत्येक प्रभागाच्या सिमा रेषेचे वर्णन करतांना उत्तर, पुर्व, दक्षीण आणि पश्चिम अशा दिशा नमुद करून सिमारेषेचे वर्णन करावे. सिमारेषा नमुद करतांना शहरातील सर्व साधारण नागरीकांना त्याची पुर्व कल्पना द्यावी.
प्रभाग रचना रचनेचा नकाशा तयार करतांना गुगल अर्थ नकाशा हाताळावा. जनगणा प्रभागाच्या सिमा निळ्या रंगाने दर्शवाव्यात. नवीन प्रभागांच्या हद्दी लाल रंगाने दर्शवाव्यात. प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा तयार करावा. नकाशा तयार झाल्यानंतर आरक्षण सोडत होई पर्यंत त्याची गोपनियता ठेवावी. हा नकाशा तयार करतांना प्रगणक गटाचे विभाजन करायचे असेल तर त्यासाठी एक परिष्ठ देण्यात आला आहे. तो भरून त्या प्रगणक गटाचे विभाजन करता येईल.
एका वेगळ्या परिशिष्ठामध्ये गुगल अर्थ डाऊनलोड करून त्याचा वापर कसा करावा. त्यात फोल्डर कसे तयार करावेत. पाच सब फोल्डर असावेत. आणि त्यात काय-काय लिहावे आणि काय लक्षता घ्यावी याचा उल्लेख करण्यात आला आहे. मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेत हा आराखडा तयार करण्यासाठी एक समिती गठित करायची आहे आणि ती समिती सन 2022 च्या निवडणुकांसाठी प्रारुप कच्चा आराखडा तयार करेल.
राजकीय दबावाला बळी न पडता प्रभाग रचना व्हावी
प्रभाग रचना करतांना आपल्याला मतदान करणारी वस्ती, गल्ली, घरे कोणती आहेत त्यावरून राजकीय मंडळी प्रभाग रचनेत दखल देतात. या संदर्भाने सुध्दा निवडणुक आयोगाने राजकीय दबावाला बळी न पडता अयोग्य प्रकारे होणाऱ्या प्रभाग रचनेवर दक्षता घेण्यास सांगितले आहे. प्रारुप आराखड तयार झाल्यावर निवडणुक आयोग त्याची तपासणी करणार आहे. तपासणीत त्रुटी आढळल्या तर त्याचे उत्तर देण्याची जबाबदारी प्रभाग समितीवर निश्चित करण्यात आली आहे. आरक्षण सोडतीपर्यंत प्रभाग रचनेची गोपनियता राहिल यासाठी दक्षता घेण्यास सांगितले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *