नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा बोर्डाचे अधिक्षक यांच्या वेतन बाबतची विचारलेली माहिती गुरूद्वारा बोर्डाचे माहिती अधिकारी आणि प्रथम अपीलीय अधिकारी यांनी माहिती न दिल्यामुळे राज्य माहिती आयुक्त खंडपीठ औरंगाबाद येथील माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी संबंधीत माहिती विनामुल्य देण्याचे आदेश गुरुद्वारा बोर्डाला दिले आहेत.
नांदेड येथील सरदार जगदीपसिंघ मोहनसिंघ नंबरदार यांनी दि.1 जून 2019 रोजी गुरूद्वारा बोर्डाचे अधिक्षक सरदार गुरुविंदरसिंघ सुरजितसिंघजी वाधवा यांना गुरूद्वारा बोर्ड नांदेड येथे अधिक्षक पदाची नियुक्ती 30 मार्च 2018 रोजी मिळाली. त्यानंतर 1 जून 2019 पर्यंत त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या वेतन बिलांची सत्यप्रत मागण्याचा अर्ज दिला होता. जन माहिती अधिकारी गुरूद्वारा बोर्ड यांनी माहिती त्रयस्थ अधिकाऱ्याची वैयक्तिक स्वरुपाची माहिती मागितली असून त्यात कोणतेही व्यापक जनहित नसल्याचे सांगत माहिती नाकारली होती. याविरुध्द नंबरदार यांनी प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे माहिती मिळावी म्हणून अपील सादर केले. पण प्रथम अपीलीय अधिकाऱ्याने जनमाहिती अधिकाऱ्याचे समर्थन करून अपील नाकारले होते.
यानंतर दुसरे अपील राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे 4 नोव्हेंबर 2019 रोजी नंबरदार यांनी अपील दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी व्ही.सी.वर घेण्यात आली होती. माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी या मागितलेल्या माहितीचे अवलोकन करून वेतन देयकांमध्ये माहितीचे दोन भाग आहेत असे आपल्या निकालात नमुद केले आहे. ज्यामध्ये एक भाग वेतनाचा एक आणि एक भाग कपातीचा असतो. यातील वेतनाचा भाग माहिती मागणाऱ्याला देणे आवश्यक आहे. त्यातील कपातीचा भाग माहिती अधिनियमातील कलम 8 नुसार देय होत नाही. म्हणून वर्तमान जनमाहिती अधिकारी गुरुद्वारा बोर्ड यांनी अपीलार्थीच्या मागणीप्रमाणे गुरूद्वारा बोर्ड अधिक्षक सरदार गुरुविंदरसिंघ वाधवा यांच्या वेतनाचा देय असलेला माहितीचा भाग जगदीपसिंघ मोहनसिंघ नंबरदार यांना 15 दिवसांच्या आत नोंदणीकृत टपालाद्वारे विनामुल्य द्यावा असे आदेश अपील क्रमांक 8534/2019 मध्ये दिले आहेत.
