नांदेड(प्रतिनिधी)-मागील सात वर्षात केंद्र सरकारने देश विकायला काढला आहे. त्या संदर्भाने जागरुकता निर्माण करावी या उद्देशातूनच व्यर्थ न हो बलिदान चलो बचाय संविधान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती कॉंगे्रसचे महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
आज कॉंग्रेस पक्षाच्यावतीने नांदेड येथे आयोजित केलेला कार्यक्रम संपल्यानंतर नाना पटोले पत्रकारांशी बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर कॉंगे्रसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील, महाराष्ट्रातील मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख यांच्यासह आ.मोहन हंबर्डे, आ.अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, बाळासाहेब देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, कॉंगे्रस प्रवक्ते मुन्तजिबोद्दीन यांची उपस्थित होती.
याप्रसंगी पुढे बोलतांना नाना पटोले म्हणाले व्यर्थ न हो बलिदान चलो बचाय संविधान हा नांदेडमधील राज्याचा दहावा कार्यक्रम आहे. भारताच्या स्वातंत्र्यातील सहभागी विरांना, त्यांच्या कुटूंबियांना सन्मानित करणे हा मुळ उद्देश आहे. स्वातंत्र्यापुर्वीचा ईतिहास आणि त्यात कॉंगे्रसचा सहभाग हा नव्या पिढीला सांगण्यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भारतीय जनता पार्टीने मागील सात वर्षात देश विकायला काढला आहे. त्यामुळे तयार झालेली परिस्थिती विशेष करून भारतीय अर्थ व्यवस्थेचा बिघडलेला तक्ता नवीन पिढीला सांगण्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असे नाना पटोले म्हणाले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत नाना पटोले यांनी कायदा हा सर्वांसाठी एकच असतो असे सांगितले. नारायण राणे विरुध्द दाखल झालेला गुन्हा हा अदखलपात्र गुन्हा आहे. त्यासाठी एवढा मोठा पोलीस फोर्स वापरून केलेली अटक बरोबर आहे काय असा प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले महाराष्ट्रात कोणीही कायद्याच्या विरुध्द वागणार नाही याची दक्षता घेण्यासाठी त्यांच्या अटकेची प्रक्रिया पुर्ण झाली. राजकारणामध्ये मुख्यमंत्र्याविषयी ज्या शब्दांनी नारायण राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्या भावना चुकीच्या असून राजकारणात आलेला असा प्रकार दुर्देवी असल्याचे नाना पटोले म्हणाले. आपल्या कार्यक्रमात सांगितलेल्या वक्तव्याचा पुर्नउच्चार करत नाना पटोले म्हणाले पुढचा मुख्यमंत्री कॉंगे्रसचा असेल.
महाराष्ट्राचे कॉंगे्रस प्रभारी एच.के.पाटील यांनी नांदेडमध्ये झालेल्या कार्यक्रमाची स्तुती करत राज्यभर असे अनेक कार्यक्रम कॉंगे्रस आयोजित करणार आहे आणि कॉंगे्रसबद्दल सर्वसामान्य माणसापर्यंत त्यांच्या भावना पोहचाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
