नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या देशातील नागरीकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या सहाय्यक समादेशक सुधाकर शिंदे यांचे सुपूत्र कबीर यांनी देहाला अग्नी देताच बामणी गावात अश्रुंनी थैमान घातले. भारताच्या तिरंगा ध्वजात सुधाकर शिंदेचे दर्शन घेणाऱ्यांना आपल्या सुपूतावर अभिमान वाटला.
दि.20 ऑगस्ट रोजी छत्तीसगड राज्यातील नारायणपूर येथे नक्षलवाद्यांनी घात लावून केलेल्या हल्यामध्ये नांदेडचे सुपूत्र सुधाकर शिंदे आणि पंजाब येथील गुरुमुखसिंघ यांनाही विर मरण आले. बामणी या छोट्याशा गावातील सुधाकर राजेंद्र शिंदे यांनी आयटीबीपीमध्ये (इंडो तिबेट बॉर्डर पोलीस) मध्ये सन 2001 मध्ये पोलीस उपनिरिक्षक या पदावर प्रवेश मिळवला. परभणी येथील कृषी विद्यापीठातून त्यांनी पदवी प्राप्त केली होती. आपल्या गावातील समस्या, तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व समस्यावर मात करत त्यांनी भारताच्या सेवेत प्रवेश मिळवला होता आपल्या जीवनात उपनिरिक्षक ते सहाय्यक समादेशक या पदापर्यंत अत्यंत मेहनतीने पदोन्नती मिळवली होती. देशाच्या वैभवाचे प्रतिक असलेल्या लालकिल्यावर सुध्दा त्यांनी सुरक्षेची जबाबदारी पुर्ण केली होती. पण दुर्देवाने त्यांना विर मरण आले.
आयटीबीपीच्या जवानांनी सुधाकर शिंदे यांचा देह 21 ऑगस्ट रोजी रात्री बामणी येथे आणला. आज. 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता बामणी शिवारात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिमसंस्कार करण्यात आले. आयटीबीपीचे जवान आणि नांदेड पोलीस यांनी सुधाकर शिंदे यांची चिता पेटताच हवेत गोळीबार करून त्यांना मानवंदना दिली. ज्या तिरंग्यामध्ये सुधाकर शिंदे यांचा देह आणला होता तो तिरंगा आयटीबीपीच्या जवानांनी अत्यंत आदराने सुधाकर शिंदे यांचे वडील रमेश शिंदे यांना दिला. कबीरला सावरता सावरता दुश्मनाच्या छातीत झटक्यात गोळी मारणारे जवान सुध्दा आपल्या अश्रुंना रोखू शकले नाहीत. कारण त्यांचा साथीदार आणि त्यांचा साहेब त्यांना सोडून गेला होता. नांदेड जिल्हा प्रशासनाने या अंतिम संस्काराची संपुर्ण जबाबदारी उचलली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुध्दा शिंदे कुंटूंबियांसाठी शब्दातून आपल्या भावना पाठविल्या आहेत.
आजच्या अंतिमसंस्कारात सुधाकर शिंदेचे पत्नी सुधा, वडील रमेश, आई, लहान भाऊ, बहिणी, मुलगा कबीर यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ.विपीन, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आ.तुषार राठोड, जिल्हा सैनिक अधिकारी महेश वडदकर, देगलूरचे उपविभागीय अधिकाीर शक्ती कदम, पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे, तहसीलदार काशिनाथ पाटील, पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थितीत होता.
यापुर्वी सुध्दा नांदेडच्या अनेक सैनिकांनी शत्रुंशी लढतांना विर मरण पत्कारले आहे. आजच्या सुधाकर शिंदे यांच्यातील त्यांचे अधिकारी असणे हा मोठा अघात आहे. नांदेड जिल्ह्यातील नागरीकांच्या मनाला हेलावून टाकणाऱ्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. शहीद सुधाकर शिंदे अमर रहे या घोषणांनी बामणी परिसरातील आसमंत दणाणून गेला होता.