नांदेड(प्रतिनिधी)-जुगाराचा ऑनलाईन प्रकार नांदेड जिल्ह्यात आता मटका जुगाराला टक्कर देणारा व्यवसाय म्हणून समोर येत आहे. अत्यंत कमी वेळात या जुगाराचा निर्णय येतो. त्यामुळे सर्व कांही झटपट होते. मटका जुगाराचा निकाल यायला बरेच तास लागतात. त्यामुळे ऑनलाईन जुगार आता हळूहळू उत्कृष्ट व्यवसाय म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. ज्यातुन नांदेडकरांचे भविष्य सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत.
दि.18 ऑगस्ट रोजी दुपारी पाऊस पडत असल्यामुळे बसस्थानकाजवळ थांबावे लागले. आणि हे थांबणे आमच्यातील पत्रकाराला हुलहुल लावणारे ठरले. त्या ठिकाणी ऑनलाईन जुगार अड्डा सुरू होता. तेथील छायाचित्र घेतले. तेथे एका बोर्डवर बरेच आकडे लिहिलेले होते. एक संगणक होते. लोक येत होते पैसे लावत होते कोणी घेवून जात होते तर कोणी रडत जात होते. रडत जाणाऱ्यांना बाहेर पाऊस येत आहे आपण भिजून जावू याची सुध्दा काळजी वाटत नव्हती. या ऑनलाईन जुगाराची माहिती घेतली तेंव्हा आपण एखाद्या आकड्यावर 10 रुपये लावले तर आपला आकडा संगणकात दिसला तर आपल्याला 90 रुपये प्राप्त होतात अशी माहिती प्राप्त झाली.
मटका जुगारामध्ये एका आकड्यावर एक रुपया लावला तर 10 रुपये प्राप्त होता. दोन आकड्यावर एक रुपया लावला तर 90 रुपये प्राप्त होतात. तीन आकड्यावर एक रुपया लावला तर 280 रुपये प्राप्त होता पण ते आकडे आले पाहिजेत हा त्यातील सर्वात मोठा आधार आहे. मटका जुगाराचा निर्णय येण्यासाठी बरेच तास लागतात. पण ऑनलाईन जुगारामध्ये सर्व कांही झटपट होते. त्यामुळे या जुगाराच्या व्यवसायात वाढ होवून नांदेडकरांच्या काम करणाऱ्या हातांना भविष्य दिसते आहे. जुगार खेळणारे मात्र नेहमीच हरतात. हा काही आजचा प्रकार नाही तर हजारो वर्षापासून जुगाराची हीच परिस्थिती आहे.
