नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेले “टार्गेट’ पुर्ण न झाल्याने पोलीस विभागाच्या बदल्यांना पुन्हा एकदा पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून 35 टक्के पेक्षा जास्त बदल्या करण्यासाठी सुध्दा मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतर मुभा ठेवण्यात आली आहे. मागील वर्षी सुध्दा पोलीस बदल्या सप्टेंबरपर्यंत सुरूच होत्या.
महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने 13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या एका शासन निर्णयात 2021 च्या मागील पाच शासन निर्णयांचा संदर्भ देण्यात आला आहे. त्यात सर्वात जवळचा शासन निर्णय 29 जुलै 2021 रोजी जारी झाला होता. या शासन निर्णयाची प्रस्तावना करतांना कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या 30 जून 2021 पर्यंत स्थगित ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने 2021-22 या वित्तीय वर्षात मर्यादेत स्वरुपात दि.14 ऑगस्ट 2021 पर्यंत बदल्या करण्यास मान्यता दिलेली आहे. हा शासन निर्णय 29 जुलै 2021 चा आहे. याच शासन निर्णयाला लक्षात घेवून राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या करतांना एकूण कार्यरत पदांच्या 25 टक्के ऐवढ्या मर्यादेत बदल्या करायच्या आहेत. त्यामध्ये 25 टक्के बदल्या या सर्वसाधारण आणि 10 टक्के विशेष बदल्या असे वर्गीकरण करण्यात आलेले आहे.
या प्रस्तावनेला पुरक असा आदेश करतांना महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांच्या डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या 31 ऑगस्टपर्यंत एकूण कार्यरत पदांच्या 35 टक्के मर्यादेत करण्यास मान्यता दिली आहे. 35 टक्केपेक्षा जास्त बदल्या करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मान्यता आवश्यक आहे. सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया 31 ऑगस्टपर्यंत पुर्ण करण्यात यावी. त्यानंतर बदल्या करायच्या असल्यास पाच वेगवेगळ्या कारणानुसार त्या बदल्या करता येतील असे ही या आदेशात नमुद आहे. ज्यामध्ये सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे भरण्यासाठी, कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सेवेतील रिक्त पदे भरण्यासाठी, कायद्या व सुव्यवस्थेच्या प्रभावी नियंत्रणाकरिता तसेच प्रशासकीय निकडीनुसार रिक्त पदे भरण्यासाठी, पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याविरोधात गंभीर स्वरुपाची तक्रार असल्यास आणि विनंतीवरुन अशा स्वरुपात या बदल्यांना मान्यता देण्यात येणार आहे. गृहविभागाने हा शासन निर्णय संकेतांक क्रमांक 202108132108323229 नुसार राज्य शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.
कोविड सुरू झाल्यानंतर हे सलग दुसरे वर्ष आले आहे. ज्यामध्ये पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुन्हा एकदा सप्टेंबर पर्यंत होणार आहेत. राज्य शासनाने निश्चित केलेले (टार्गेट) पुर्ण झाले नसेल म्हणूनच पोलीस बदल्यांना अशी मुदतवाढ देण्यात आली असेल.राज्य शासनाने आपले टार्गेट पुर्ण करतांना पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मर्जीचापण विचार करावा अशी अपेक्षा आहे.
