महाराष्ट्र

सर्व माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय शुल्कांमध्ये 15 टक्क्यांची सूट

नांदेड (प्रतिनिधी)-सर्वोच्च न्यायालयातील एका निकालानंतर महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने जारी केलेल्या एका शासन निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षात शालेय शुल्कांमध्ये 15 टक्के कपात करण्यात यावी असे आदेश दिले आहेत. या शासन निर्णयावर सहसचिव इम्तियाज काझी यांची डिजीटल स्वाक्षरी आहे.
सर्वोच्च न्यायालयात दिवाणी अपिल क्र.1724/2021 ही इंडियन स्कूल ऑफ जोधपूर विरुध्द राजस्थान राज्य या नावाने चालली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या आठ मुद्यांवर शालेय शिक्षणाच्या शैक्षणिक वर्षात काय करावे यासाठी सूचना दिल्या. 50 टक्के शुल्क सवलत करुन द्यावेत, 50 टक्के विकास शुल्क कमी करावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.
यामध्ये शाळांची संख्या, त्यांच्याकडे असलेल्या सोयी आणि त्यांचे होणारे नुकसान यावर विचार करण्यासाठी वेळ नाही अशी नोंद करुन सर्वोच्च न्यायालयाने पालकांना दिलासा मिळावा याची आवश्यकता लक्षात घेवून एकूण निश्चित करण्यात आलेल्या शालेय शुल्कामध्ये 15 टक्के कपात सुचवली होती. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद क्र.162 नुसार राज्य विधिमंडळाला कायदे करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार शासनाने हा निर्णय जाहीर केला आहे.
या निर्णयानुसार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण शालेय शुल्कांमध्ये 15 टक्के कपात केली आहे. या निर्णयापूर्वी ज्या पालकांनी पूर्ण फिस भरली आहे अशी अतिरिक्त फिस पुढील शालेय शुल्कांमध्ये समायोजित करावी. आणि तसे शक्य नसल्यास ते शालेय शुल्क परत करावे. कपात करण्यात आलेल्या शालेय शुल्काबद्दल काही वाद निर्माण झाल्यास 26 फेब्रुवारी 2020 नुसार गठीत करण्यात आलेल्या विभागीय तक्रार निवारण समितीकडे अर्ज करावा. यात विभागीय समितीचा निर्णय अंतिम राहील.
विद्यार्थ्यांनी महामारीच्या काळात शाळेचे शुलक भरले नाही म्हणून त्यांना कोणत्याही परिक्षेस प्रतिबंध करता येणार नाही तसेच निकाल रोखून धरता येणार नाही, असेही या आदेशात नमूद आहे. हे आदेश सर्व शैक्षणिक मंडळांना आणि सर्व माध्यमांच्या शाळांना लागू आहेत. राज्य शासनाने आपला हा निर्णय संकेतांक क्र.202108121955010821 नुसार आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *