नांदेड(प्रतिनिधी)-न्यायालयात न्यायदानाचे पवित्र काम चालते. न्याय प्रक्रियेत वकिल हा महत्वाचा घटक असून तो आपल्या पक्षकारास न्याय मिळवून मिळवून देत असतो. काही वेळा केंद्र व राज्य सरकारकडून नोटरी म्हणून वकिलांची नियुक्ती केली जाते. या पदास न्यायालयीन प्रशासकीय दर्जा दिला आहे.
मागील काही वर्षांपासून नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात अतिशय गुंड प्रवृत्तीचे अशिक्षीत अर्धशिक्षीत दलाल कार्यरत झालेले असून त्यांच्याकडे नोटरी हा व्यवसाय करण्याचा परवाना नाही तरी पण ते स्वत: वकिल असल्याच्या अर्विभावात न्यायालय परीसरात फुटपाथ वर टेबल टाकून छत्र्या लावून नोटरीचा बोर्ड लावून राजरोपणे नोटरीचा व्यवसाय करीत आहेत. यात खरे कोण व तोतया कोण हे सामान्य नागरीकास कसे कळणार अशा बोगस नोटरी कडून कोणत्याही दस्ताऐवजावर सही केली जात असून कितीही पैसे घेतले जात आहे. त्यामुळे सामान्य जनतेची मोठी फसवणूक होत आहे. याचबरोबर न्यायालयसमोरुन ये-जा करणाऱ्यांंना हटकले जात आहे. मुली व महिलांना आवाज देवून बोलावले जात आहे. एक प्रकारचा बाजार मांडला आहे. प्रसंगी महिला व मुलींना न्यायालयासमोरुन जाता येताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वेळप्रसंगी पैशासाठी भांडणे देखील केली जात आहेत. यामुळे नोटरीधारक वकीलांची प्रतिमा मल्लीन होत असून या व्यवसायाला वेगळे रुप आणले जात आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी याकडे लक्ष देवून संबंधीतावर कारवाई करावी व प्रमुख जिल्हा न्यायाधीश साहेबांनी हा प्रकार थांबवून नोटरीधारक वकिलांना इतर न्यायालयाप्रमाणे सन्मानाने न्यायालय परिसरात जागा उपलब्ध करुन देवून फुटपाथवरील हा नोटरी बाजार थांबवावा ही अपेक्ष सर्व जनतेतून होत आहे.
न्यायालयातील दलालाविरोधात कारवाई करण्याबाबतचे निवेदन नांदेड जिल्हा नोटरी संर्घष समितीचे जिल्हाध्यक्ष ऍड. गायकवाड बी.एम., ऍड. शेख शफीयोदीन एस., ऍड. माणिकराव वाखरडे, ऍड. रामदास शेरे, ऍड. माधव तिडके, ऍड. प्रदीप शिंदे, ऍड. जी.जी. तेलंग, ऍड. जी.जी. इंगोले, ऍड. दिलीप गंगातीर यांनी संंबंधीत अधिकाऱ्यांना दिले आहे.
