क्राईम

भाच्याला मारणारा मामा दोन सहकार्‍यांसह पाच दिवस पोलीस कोठडीत ;एकाला भोवळ आल्याने तो रुग्णालयात 

नांदेड(प्रतिनिधी)-सन २०१७ मध्ये आपल्या भाच्याचा खून करून त्याचे प्रेत पुरणार्‍या मामासह चार जणांना वजिराबाद पोलीसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असतांना एक न्यायालयात भोवळ येवून पडला. त्याला उपचारासाठी दवाखान्यात पाठविण्यात आले आहे. उर्वरीत तिघांना मुख्य न्यायदंडाधिकारी योगेशकुमार रहांगडाले यांनी पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. 
                  नांदेड येथील संजय बाबूलाल पाईकराव या माणसाने ९ सप्टेंबर २०१७ रोजी वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांचा भाचा नागेश उर्फ युवराज जोंधळे (१०) यास कोणी तरी अज्ञात माणसाने ३१ ऑगस्ट रोजी पळवून नेले आहे. वजिराबाद पोलीसांनी तेंव्हा अल्पवयीन बालकाला पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा क्रमांक ३३९/२०१७ भारतीय दंडसंहितेच्या कलम ३६३ नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पुढे अनैतिक मानवी वाहतूक विरोधी कक्ष यांच्याकडे वर्ग झाला. या कक्षाने नांदेडच्या तपासीक अंमलदार अनिता दिनकर यांनी पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मदतीने युवराज जोंधळेला मारुन त्याचे प्रेत पुरणारा त्याचा मामा / ३३९ गुन्ह्याचा फिर्यादी आणि इतर तिन लोकांना ताब्यात घेतले. 
                  काल दि.१० ऑगस्ट रोजी बरोबर चार वर्षानंतर आपला भाचा नागेश उर्फ युवराज जोंधळे याचा गळादाबून खून केल्याच्या आरोपात मामा संजय बाबूलाल पाईकराव(४०), यादव किशनराव थोरात (६६), साहेबराव लक्ष्मणराव कोकरे (४२) आणि सोपान मल्हारी भुरे (६५) या चार जणांना अटक केली. आता गुन्हा क्रमांक ३३९ मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ ची वाढ झाली आहे. 
                  वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवराज जमदाडे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला,आज ११ ऑगस्ट रोजी युवराज जमदाडे त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार शरदचंद्र चावरे, प्रदीप भद्रे, प्रदीप कांबळे यांनी पकडलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयात साहेबराव लक्ष्मणराव कोकरेला भोवळ आली आणि ते खाली पडले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर शिवराज जमदाडे आणि सरकारी वकील ऍड. सिमा जोहिरे यांनी चार वर्षापुर्वीच्या या गुन्ह्यातील तपासात सुसुत्रता आणण्यासाठी आणि पुराव्यांची जोड करून त्याची साखळी तयार करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. साहेबराव कोकरे वगळता उर्वरीत तिघांना मुख्य न्यायदंडाधिकारी योगेशकुमार रहांगडाले यांनी पाच दिवस अर्थात १६ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.