द्वारकादास चिखलीकरांची बारीक दृष्टी
नांदेड(प्रतिनिधी)-चार वर्षापुर्वी आपला भाचा पळवून नेण्यात आला आहे अशी तक्रार देणारा मामाच भाच्याचा मारेकरी निघाला. ही संचिकांच्या धुळीमध्ये लपलेली घटना नांदेडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने स्थानिक गुन्हा शाखेतील दबरदस्त पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या नेतृत्वात उघडकीस आणली आहे.
लालवाडी येथे राहणारे ऍटो चालक संजय बाबूलाल पाईकराव (४०) यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात ९ सप्टेंबर २०१७ रोजी तक्रार दिली की, दि.३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ७ या वेळेदरम्यान गंगाचाळ येथील त्यांची बहिण दुकानावर गेली आणि परत आली तेंव्हा त्यांचा मुलगा युवराज जोंधळे (१०) हा घरात नव्हता. ही घटना त्या आईने आपला भाऊ संजय पाईकरावला सांगितली होती. त्यानुसार वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक ३३९/२०१७ भारतीय दंडसंहितेच्या कलम ३६३ नुसार दाखल केला.
घडलेल्या कोणत्याही घटनेची तिव्रता हळूहळू संपत असते. म्हणूनच वेळ हे सर्व जखमांचे औषध आहे असे म्हटले जाते. याही प्रकरणात असेच झाले. एक-एक दिवस पुढे गेला आणि युवराजच्या गायब होण्याची तिव्रता हळूहळू संपत गेली. त्यामुळे हे प्रकरण पुढे अनैतिक मानवी वाहतुक विरोधी कक्ष (ऍन्टी ह्युमन ट्रॅङ्गिकींग सेल) सोलापूर यांच्याकडे वर्ग झाले होते. याप्रकरणाला पुढे नांदेडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने आपल्या तपासावर ठेवले होते.या प्रकरणाचा पोलीस उपनिरिक्षक अनिता दिनकर यांच्याकडे आहे.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यात असलेली अत्यंत तिक्ष्ण नजर, बारकाईने प्रत्येक कामाची देखरेख आणि त्या कामाला पुर्ण करण्याची जिद्द या सर्व ताकतींमुळे अनिता दिनकर यांना त्यांचे मार्गदर्शन लाभत गेले.अनिता दिनकर यांच्या मदतीसाठी पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार मारोती माले, अच्युत मोरे, शितल केंद्रे यांनी परिश्रम घेतले.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष अपर पोलीस अधिक्षकांच्या प्रमुख मार्गदर्शनात कार्य करत असते. चिखलीकर यांनी प्राप्त झालेल्या माहितीचे सविस्तर विश्लेषण पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्याकडे सादर केले. त्यानंतर संजय बाबूलाल पाईकराव, यादव किशनराव थोरात आणि साहेबराव लक्ष्मण कोकरे या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या विचारणेनंतर अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली. ९ सप्टेंबर रोजी संजय पाईकरावने युवराज जोंधळेला कोणी तरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीत त्याने स्वत:च इतरांच्या मदतीने आपला भाचा युवराजचा खून करून त्याचे प्रेत गायब केले होते. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी मी फक्त स्थानिक गुन्हा शाखेचाच पोलीस निरिक्षक नाही तर जिल्ह्यात कोणत्याही पोलीस अधिकारी व कर्मचार्यांकडे प्रलंबित असलेले काम ही माझीच जबाबदारी आहे हे या कामानुसार सिध्द करून दाखवले.
या प्रकरणात संजय पाईकराव सोबत दोन लोक त्याचे सहकारी गुन्हेगार आहेत. या आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून त्या गुन्हे संदर्भाचे पुरावे जोडून पुराव्यांची मजबुत साखळी तयार केली तरच संजय पाईकरावला आणि त्यांच्या सहकारी गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत नेता येईल.
पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, गृह पोलीस उपअधिक्षक विकास तोटावार, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्वर धुमाळ, डॉ.सिध्देश्वर भोरे, सचिन सांगळे यांच्यासह अनेक अधिकार्यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि स्थानीक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांचे या कामासाठी कौतुक केले आहे.