क्राईम

प्रविण पोकर्णा, माधव कदम, प्रेमजितसिंघ टेलर, जितेंद्र सुरनर यांच्यासह 9 जणांमुळे ययाती मुंडेने केली आत्महत्या

पत्नी ज्योती मुंडेच्या तक्रारीनंतर 9 जणांविरुध्द गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-आपली संपत्ती विकून सुध्दा कर्ज आणि त्याचे व्याज देणे झाले नाही म्हणून एका युवकाने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलीसांनी प्रविण पोकर्णा, करमजितसिंघ बेदी, जितेंद्र सुरनर, संजय जोगदंड अशा एकूण 9 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मरणाऱ्या ययाती उर्फ यश मुंडेवर 65.50 लाखांचे कर्ज होते.त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याची तक्रार ज्योती ययाती मुंडे यांनी दिली आहे.
दि.5 ऑगस्ट रोजी श्रीनगरमध्ये राहणारे ययाती हे सकाळी 5 वाजता उठले त्यांनी आपली प्रात:क्रिया करुन मुलांना अंघोळ घातली.त्यानंतर ते पुन्हा झोपले आणि उठल्यानंतर मला चहा करण्यासाठी सांगितला. चहा घेवून गेले तेंव्हा मी जप करतो आहे असे सांगून बेडरुमचे दार बंद केले. थोड्यावेळाने मी दार वाजवले तेंव्हा काही वेळ थांब असे सांगितले. त्यानंतर अर्ध्या तासाने जवळपास 10.30 वाजेच्यासुमारास मी आवाज देवून दार वाजविले. पण कांहीच प्रतिसाद आला नाही. मी जोरजोरात दार वाजविल्याने सासु व जावा वर आल्या. त्यानंतर आम्ही दार तोडले. तेंव्हा माझ्या पतीने पंख्याला दोरीने गळफास लावून घेतलेले दिसले. आम्ही चाकुने दोरी कापली आणि त्यांची छाती, हात दाबून, ऑक्सीमिटर लावून पाहिले तेंव्हा एकही अंक दिसला नाही. त्यानंतर आम्ही इतरांच्या मदतीने त्यांना खाजगी रुग्णालयात नेले. त्यांनी सरकारी रुग्णालयात नेण्यास सांगितले. सरकारी रुग्णालयात तपासणी करून डॉक्टरांनी माझे पती ययाती मुंडे मरण पावल्याचे सांगितले.
माझ्या पतीचे प्रेत पी.एम. रुमध्ये ठेवल्यानंतर भाग्यनगर पोलीस आले. त्यांनी प्रेताचा पंचनामा केला तेंव्हा माझ्या पतीचे पॅन्टच्या खिशातून एक चिठ्ठी काढली. त्यावर माझे पती ययाती मुंडे यांची स्वाक्षरी होती. त्यावर माझ्या पतीच्या हस्ताक्षरात करमजितसिंघ बेदी-6 लाख, किशनजितसिंघ -8 लाख , करमजितसिंघ कालरा-7 लाख, प्रेमजितसिंघ टेलर-8 लाख , जितेंद्र सुरनर-3 लाख, माधव कदम-8 लाख, संजय जोगदंड-8 लाख, आणि प्रविण पोकर्णा-10.50 लाख अशी नावे टाकून सदर लोकांच्या पैशाची परतफेड मी करू शकत नाही, हे पैशासाठी तगादा लावत आहेत, घरी येवून बसतो असा मानसिक छळ करत आहेत. मी हे सर्व सहन करू शकत नाही. मी कर्जास कंटाळून जीव देत आहे असे लिहिले होते. सदरच्या चिठ्ठीवरचे हस्ताक्षर माझ्या पतीचेच आहे. पोलीसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे.
दोन वर्षापुर्वी माझे पती ययाती मुंडे यांनी काढलेल्या कर्जाची परतफेड करतांना श्रीनगरमधील दोन दुकाने व पहिल्या मजल्याचा हॉल विकून कर्जाची परतफेड केली. तरीपण हे सर्व जण माझ्या पतीवर तगादा लावून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. या सर्व 9 लोकांच्या त्रासाला कंटाळूनच ययाती मुंडेने आत्महत्या केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य कायदेशीर कार्यवाही व्हावी असे ज्योती ययाती मुंडे यांनी अर्जात लिहिले आहे. भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 306, 34 नुसार गुन्हा क्रमांक 263/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक आश्रुबा घाटे हे करीत आहेत.

या सुध्दा गॅंगच आहेत
नांदेडमध्ये मागील वर्षापासून सुरू असलेल्या गॅंगवारमध्ये विक्की चव्हाणचा खून झाला. त्यानंतर विक्की ठाकूरचा खून झाला.या दोन खूनांमध्ये गुन्हेगार असलेल्या जवळपास सर्वच मंडळींना निष्णात प्रशासकीय अधिकारी पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्गदर्शनात “दबंग’ पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आणि त्यांच्या पथकाने आज गजाआड केले आहे. या दोन गॅंगमधील लोकांनी अनेक लुटीचे प्रकार घडविले. ते सर्वसामान्य माणसाशी जोडलेले आहेत. एक दुसऱ्याच्या विरुध्दचे व्यक्ती मारण्यासाठी यांनी केलेले काम रस्त्यावरचे आहे. पण ययाती मुंडे प्रकरणात ज्या 9 लोकांची नावे आली आहेत. ते तर समाजात प्रतिष्ठीत मानली जातात. आणि प्रतिष्ठीत मंडळी जर असे करीत असेल तर काय लिहावे?. समाजात वावरणारी ही मंडळी सुध्दा पांढऱ्या पेशीची गुन्हेगार मंडळीच आहे. ज्याप्रमाणे गॅंगवारच्या गुुंडांना पोलीसांनी गजाआड केले त्याचप्रमाणे या सर्वांना सुध्दा गजाआड करून पोलीसांनी दाखवले पाहिजे की आम्ही समाजाचे रक्षण करण्यासाठीच आहोत. ययाती मुंडे व संदर्भाची तक्रार आली पण अशा अनंत तक्रारी आहेत ज्या पोलीस ठाण्यापर्यंत आल्याच नाहीत. त्याचाही ठाव ठिकाणा पोलीसांनी शोधला पाहिजे तरच ही पांढरपेशी मंडळी कुठे तरी जेरीला येईल.25 रुपये कर्ज देवून त्याचे 200 रुपये वसुल करणारी ही मंडळी समाजाचे रक्त शोषण करीत आहे.यावर निसार तांबोळी आणि प्रमोदकुमार शेवाळे हे या मंडळींना चांगलेच मोठा इंजेक्शन देतील अशी समाजाला अपेक्षा आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *