क्राईम

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या जबरी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हा शाखेने 48 तासाच्या आत उघडकीस आणला

 नांदेड(प्रतिनिधी)-दि.6 ऑगस्ट रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या लुटीतील तीन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हा शाखेने 48 तास पुर्ण होण्यापुर्वीच जेरबंद केले आहे. दुर्देवाने यात दोन अल्पवयीन बालके आहेत. अल्पवयीन बालकांना त्यांच्या पालकांनी नक्कीच शिक्षण देण्याची गरज आहे.
                    दि.6 ऑगस्ट रोजी शेतकरी अनिल साहेबराव काळे हे आपल्या शेतातून घराकडे परत येत असतांना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील आदिनाथ चौकात एका दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून लुट केली. त्यामध्ये 10 हजार 500 रुपये रोख रक्कम आणि 17 हजार रुपयांचा मोबाईल तीन दरोडेखोरांनी लुटून नेला होता. या बाबत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
                 या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्या विभागातील पथकाला या लोकांना शोधण्यासाठी पाठविले. पोलीसांनी काढलेल्या माहिती आधारावर हे दरोडेखोर मामा चौक परिसरात मोटारसायकलवर फिरत होते. तेथे त्यांनी तीन जणांना ताब्यात घेतले. त्यातील दोन अल्पवयीन, विधीसंघर्षग्रस्त बालके आहेत. तिसरा जसपालसिंघ दिवाणसिंघ संधू (21) रा.शहीदपुरा भगतसिंग रोड नांदेड हा आहे. अनिल काळेकडून बळजबरीने चोरलेला मोबाईल आणि पाचशे रुपये त्यांच्याकडे सापडले. ते पंचासमक्ष जप्त करण्यात आले. विधी संघर्षग्रस्त बालकांना नोटीस देवून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दरोडेखोरांनी दरोडा करतांना वापरलेली दुचाकी गाडी पोलीसांनी जप्त केली आहे. या गाडीची किंमत 50 हजार रुपये आहे.
                      पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, इतवारा विभागाचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांनी 48 तासाच्या आत दरोडेखोर जेरबंद करणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेतील  पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, आशिष बोराटे, तोंडी आदेशाने स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत पोलीस उप निरीक्षक परमेश्र्वर चव्हाण, पोलीस अंमलदार शाहु, तेलंग, दमदार संजय केंद्रे, करले , जिंकलवाड, बैनवाड, चव्हाण आणि शिंदे यांचे कौतुक केले आहे.
गुन्ह्यात अल्पवयीन बालकांचा सहभाग घातक 
स्थानिक गुन्हा शाखेने या आठवड्यात दोन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. त्यामध्ये एक लिंबगाव आणि एक नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील जबरी चोरीचे असे दोन प्रकार आहेत. लिंबगाव पोलीस ठाण्यातील गुन्ह्यामध्ये दोन आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात दोन असे चार विधी संघर्षग्रस्त बालक जबरी चोरीसारख्या गुन्ह्यात सहभागी आहेत. अल्पवयीन बालकांसाठी असलेला कायदा अत्यत सोपा आहे. त्यामुळे पोलीस त्यांना पकडल्यानंतर सुध्दा नोटीस देण्याशिवाय कायहीच करू शकत नाही. पण अल्पवयीन बालकांनी जबरी चोरीसारख्या गुन्हयात सहभाग दाखविणे हे समाजासाठी  अत्यंत घातक आहे. यासाठी आता पालकांनीच याची दक्षता घेणे आवश्यक आहे. नंतर मात्र पोलीसांसमोर रडून काही होणार नाही. आपली मुले आपल्यासाठी काय करतात. यापेक्षा समाजासाठी किती घातक आहेत हे पालकांनी जरूर लक्षात घ्यावे. जी बालके विधीसंघर्षग्रस्त बालक ठरतात. त्यापेक्षा आज जी बालके 10 वर्षाचीच आहेत. त्यांच्या आई-वडीलांनी आपल्या बालकांवर अत्यंत बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. नाही तर याचा परिणाम समाजावर भयंकर झाल्याशिवाय राहणार नाही. 
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.