

नांदेड(प्रतिनिधी)-सिव्हील इंजिनिअर निखील विष्णुदास मानकर यांच्या मृत्यूची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी गोविंदराव सिरमनवार व ऍड. जी.एस.रायबोळे यांनी मुख्यमंत्र्यांसह संबंधीत मंत्री आणि अधिकाऱ्यांना केली असून माहूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसंत झरीकरसह अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नावाचा समावेश असल्याने एकच खळबळ माजली आहे.
किनवट येथील गोविंदराव सिरमनवार आणि ऍड.जी.एस.रायबोळे यांनी पोलीस उपमहानिरिक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड व पोलीस अधिक्षक नांदेड यांना दिलेल्या तक्रारीत रंगपंचमीच्या दिवशी राज्यात कोरोनाच्या संचार बंदी असतांना माहूरच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता वसंत झरीकर, शाखा अभियंता उमाळे, कनिष्ठ अभियंता अमर धुर्वे, राठोड यांच्यासह वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक तसेच मयत निखील विष्णु मानकर यांनी दारु पिऊन व ओली मटणाची पार्टी करून पैन गंगेच्या नदीपात्रात पोहायला गेले. सर्व बेजबाबदार अभियंत्याच्या हलगर्जीपणामुळे पैनगंगेच्या नदीपात्रात गेलेल्या निखील मानकर यांच्या नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. मयत मानकर हा शाखा अभियंता उमाळे यांचा मेहुणा होता. सदरील मृत्यूचे गंभीर प्रकरण दडवून टाकण्यात आले. सर्व अभियंत्यांनी पोलीस स्टेशन सिंदखेडला लाच देऊन आकस्मात मृत्यूची नोंद करून प्रकरण निकाली काढले. दि.29 मार्च 2021 या कालावधीत राज्यात कोरोनामुळे दारुचे दुकान बंद असतांना ह्या लोकांना दारुचे बॉक्स पिण्यासाठी कसे काय मिळाले? सर्वत्र लॉकडाऊन असतांना इतके लोक एकत्र येऊन कशी ओली पार्टी केली. याची सिआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी.
तसेच दि.29-03-2021 ते 20-04-2021 च्या कालावधीत सर्व अभियंत्यांच्या फोनचे लोकेशन व कॉल रेकॉर्डींग तपासणी वकरण्यात यावी. गंभीर गुन्ह्याची माहिती पोलीस स्टेशन सिंदखेड येथे माहिती अधिकारात मागणी केल्यानंतर पोलीसांनी माहिती देण्यास नकार दिला.
याप्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून मृत्यूचे गूढ उकलावे व संबंधीत सर्व दोषी अभियंत्यांवर गुन्हा दाखल करावा व संबंधीत सर्व अभियंत्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, खा.हेमंत पाटील, पोलीस महासंचालक मुंबई, पोलीस महानिरिक्षक नांदेड परिक्षेत्र, पोलीस अधिक्षक नांदेड, उपविभागीय पोलीश्रस अधिकारी माहूर, कळमनुरीचे आ.संतोष बांगर व किनवटचे आ.भिमराव केराम यांना देण्यात आल्याचे नमुद करण्यात आले आहे.