नांदेड (प्रतिनिधी)-गवतापासून गॅस निर्मिती प्रकल्प उभा करण्याच्या नावाखाली एक कंपनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर शेअर्स गोळा करण्याचे काम करीत आहे. त्यासाठी कंपनीने तालुका (15 लाख)व गावपातळीवर (1.5 लाख) रुपये घेऊन काहींना डीलरशिप व शेअर्स संकलनाचे काम दिले आहे. मोठ-मोठय़ा व प्रतिष्ठित शेतकऱ्यांनी या कंपनीची डीलरशिप घेतली त्यामुळे या लोकांवर विश्वास ठेवून ग्रामीण भागातील शेतकरीही कंपनीचे शेअर्स विकत घेत आहेत. याबाबत आम्ही कंपनीने काढलेल्या माहिती पुस्तके वरील क्रमांकावर फोन करून कंपनी व कंपनीच्या प्रकल्पाविषयी चौकशी केली असता कुणीही समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच कंपनीची डीलरशिप घेतलेल्या काही लोकांनी आम्ही फसलो अशी भावना व्यक्त केली त्यामुळे शेतकरी बांधवांनी अशा कोणत्याही कंपनीचे शेअर्स घेताना सदरील कंपनीबाबत सखोल चौकशी करावी व नंतरच शेअर्स घ्यावेत जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही असे आवाहन शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे .
गवतापासून गॅस निर्मिती करण्यासाठी करोडो रुपयांचे प्रकल्प उभे करण्यात येणार असल्याचे दिवास्वप्न दाखवून काही शेतकरी उत्पादक कंपन्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शेअर्सपोटी शेतकऱ्यांकडून रक्कम जमा करीत आहेत. शेतकरी आकर्षित होतील असे आकर्षक माहितीपुस्तिका पत्रके काढण्यात आली आहेत परंतु त्यावर कंपनीचे चालक -मालक, संचालक ,मुख्य कार्यकारी अधिकारी या जबाबदार व्यक्तींचे नाव/पत्ता दिलेला नाही . केवळ काही मोबाईल नंबर दिले आहेत. दीड लाख रुपयांची गावपातळीवरील डीलरशिप घेतली तर वर्षांला सहा लाख रुपयांची कमाई होऊ शकते असे स्वप्न दाखवुन कंपनीचे शेअर्स गोळा करण्याचे काम प्रतिष्ठित व मोठ्या शेतकऱ्यांना दिले आहे. आपल्या भागातील मोठा प्रतिष्ठित शेतकरीच शेअर्स घ्या म्हणत असल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी चौकशी न करता शेअर्स घेत आहेत. शेअर्स संकलन करणाऱ्यांनाही कंपनीच्या बाबतीत फारशी माहिती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे म्हणून शेतकऱ्यांनी कोणत्याही कंपनीचे शेअर्स घेताना सदरील कंपनीची सखोल चौकशी करावी कंपनी कुणाची आहे? कधी स्थापन झाली? त्या कंपनीची विश्वासनियता किती? ज्या प्रकल्पासाठी शेअर्स घेत आहोत तसे प्रकल्प अन्य कुठे कार्यान्वित आहेत का? पन्नास-शंभर कोटी रुपयांचा प्रकल्प उभा करण्याची क्षमता कंपनीची आहे का ? वर्ष -दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेली कंपनी एवढा मोठा प्रकल्प उभा करू शकेल का ? यासह अन्य बाबींची सखोल चौकशी करूनच शेतकऱ्यांनी शेअर्स खरेदी करावीत जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही.म्हणून जे लोक शेअर्स विक्री करत आहेत त्यांनीसुद्धा कंपनीच्या बाबतीत पुनश्च सखोल चौकशी करावी माहिती घ्यावी व नंतरच शेतकऱ्यांना शेअर्स द्यावेत तसेच शेतकऱ्यांनीही आपल्या जवळच्या व्यक्ती शेअर्स घ्या म्हणत आहे म्हणून न घेता स्वत त्या कंपनीबाबत प्रत्यक्ष चौकशी पाहणी करुनच शेअर्स घ्यावेत, असे आवाहन शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे .
