महाराष्ट्र

मृत्यूपुर्व जबाब आता खाजगी शिक्षीत माणुस सुध्दा घेवू शकतो

नांदेड(प्रतिनिधी)-उच्च न्यायालयाच्या एका फौजदारी अर्जातील निकालानुसार आणि राज्याच्या गृहविभागाच्या परिपत्रकानुसार कोणाचाही मृत्यूपुर्व जबाब नोंदविण्यासाठी ती व्यक्ती न्यायदंडाधिकारी किंवा विशेष न्यायदंडाधिकारी असण्याची गरज नाही. डॉक्टर किंवा खाजगी व्यक्ती सुध्दा एखाद्या व्यक्तीचा मृत्यूपुर्व जबाब नोंदवू शकतो असे परिपत्रक परभणी येथील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी जारी केले आहे.
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ यांनी फौजदारी अर्ज क्रमांक 905/2010 चा निकाल 2 सप्टेंबर 2010 रोजी दिला. त्यामध्ये मृत्यूपुर्व जबाब नोंदवितांना काय करावे याचे सविस्तर विश्लेषण केले आहे. त्या आधारावर गृह विभागाच्या उपसचिवांनी 19 जानेवारी 2011 रोजी शासन निर्णय जारी केला होता. तरीपण त्या पध्दतीनुसार मृत्यूपुर्व जबाब नोंदवले जात नाहीत. याची दखल घेत परभणीचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी 4 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व पोलीस निरिक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, सर्व तहसीलदार, सर्व नायब तहसीलदार यांना हे परिपत्रक पाठविले आहे.
मृत्यूपुर्व जबानी नोंदविण्यासाठी कांही वेळा निर्माण झालेली तातडी विचारात घेता मृत्यूपुर्व जबानी नोंदविण्यासाठी कुठलेही बंधन घालता येणार नाही. कोणत्याही शिक्षीत व्यक्तीकडून मृत्यूपुर्व जबाब नोंदवता येतो. ज्या ठिकाणी शक्य आहे. त्या ठिकाणी या कामासाठी नेमलेल्या दंडाधिकाऱ्यांमार्फत मृत्यूपुर्व जबाब नोंदविला जावा असे या परिपत्रकात लिहिलेले आहे. उच्च न्यायालयाचा निकाल आणि शासनाचे परिपत्रक विचारात घेता कोणताही शिक्षीत व्यक्ती किंवा डॉक्टर मृत्यूपुर्व जबाब नोंदवून घेवू शकतो. प्रत्येक वेळी कार्यकारी दंडाधिकारी यांनीच मृत्यूपुर्व जबानी घ्यावी हा अट्टहास तातडीच्यावेळी करण्यात येवू नये.
मृत्यू पुर्व जबानी कशी घ्यावी या बाबत निर्देश करतांना जबाब देणारी व्यक्ती बोलण्याच्या स्थितीत नसेल तर खूणांनी उत्तरे द्यायला सांगावी आणि ती उत्तरे त्या व्यक्तीने दाखविलेल्या खूणा प्रस्तावनेसह लिहुन घ्यावी. अशा वेळी शक्य झाल्यास व्हिडीओ चित्रीकरण करावे. जबाब संपल्यानंतर तो जबाब देणाऱ्या व्यक्तींना वाचवून दाखविण्यात यावा आणि तो योग्यरित्या नोंदविला आहे काय असे विचारून त्यांची मान्यता घ्यावी. जाबब संपल्यावर जबाब देणाऱ्याची स्वाक्षरी आणि अंगठा सुध्दा घ्यावा. त्यानंतर त्यावर डॉक्टर आणि साक्षीदारांची स्वाक्षरी घ्यावी. जबाब देतांना मध्येच असा जबाब देणारा व्यक्ती मरण पावला किंवा बेशुध्द झाला तर झालेल्या जबाबावर तशी नोंद करून त्यावर डॉक्टरांची व साक्षीदारांची स्वाक्षरी घ्यावी. मृत्यू पुर्व जबाब घेतांना शक्यतो पोलीस हजर असू नये. मृत्यूपुर्व जबाब सुरू असतांना कांही प्रश्न विचारावेत. तुमचे नाव काय आहे, तुम्ही पुर्ण शुध्दीवर आहात काय,तुम्हाला जबाब द्यायचा आहे काय, मी दंडाधिकारी /डॉक्टर/ खाजगी व्यक्ती आहे, मी तुमचा जबाब घेणार आहे, हे तुम्हाला समजले काय, तुमची मानसीक स्थिती जबाब देण्यासारखी आहे काय, हा जबाब तुम्ही स्वखुशीने देत आहात काय, आता तुम्ही कोठे आहेत हे माहित आहे काय, तुमचे वय काय आहे, तुमचा पत्ता काय आहे, घटना कोठे आणि किती वाजता घडली, काय घटना घडली त्याचे वर्णन करा, तुमची कोणाविरुध्द तक्रार आहे काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे तो देईल त्या भाषेत लिहावी. जबाब लिहुन झाल्यानंतर स्वत:ची दिनांकीत व वेळ नमुद करून स्वाक्षरी करावी. त्यानंतर त्यावर मुद्रा उमटवावी. त्यानंतर उपस्थित असलेले डॉक्ट आणि साक्षीदार यांची स्वाक्षरी सुध्दा दिनांक व वेळ टाकून घ्यावी. मृत्यू पुर्व जबाब शपथेवर घेता जात नाही. त्यामुळे डॉक्टर व साक्षीदार हे निष्पक्ष असावेत. जबाब घेतांना जबाब देणाऱ्याला काही सुचवू नये किंवा सुचक प्रश्न विचारू नये.
परभणी येथील न्यायदंडाधिकाऱ्यांनी हे परिपत्रक उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जारी केले आहे. म्हणजेच हे परिपत्रक किंवा उच्च न्यायालयाचा निर्णय हा सर्व राज्याला बंधनकारक आहे. त्यामुळे मृत्यूपुर्व जबाब आता असा घ्यायला पाहिजे हे मांडण्यासाठीच हा शब्द प्रपंच.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.