नांदेड (प्रतिनिधी)- उत्पन्न प्रमाणपत्र आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यासाठी 3 हजार रूपये लाच स्वीकारणाऱ्या तहसील कार्यालयातील एका महसूल सहायकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे.
दि. 6 ऑगस्ट रोजी एका तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, लोहा तहसील कार्यालयातील त्यांनी आणि त्यांच्या इतर सहा मित्रांनी उत्पन्न प्रमाणपत्र आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज केला होता. या विभागातील महसूल सहायक (लिपीक) तहसील कार्यालय, लोहा येथील देवबा नारायण वाघमोडे हे 3 हजार 500 रूपये लाचेची मागणी करीत आहेत. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत पडताळणी केली असता तडजोडीअंती 3 हजार रूपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
तहसील कार्यालय लोहा येथील अभिलेख कक्ष परिसरात लावलेल्या सापळ्यादरम्यान देवबा नारायण वाघमोडे (48) रा. राम मंदिरजवळ शिक्षक कॉलनी लोहा याने तक्रारदाराकडून 3 हजार रूपये लाच स्वीकारली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना जेरबंद केले. याबाबत लोहा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल प्रक्रिया वृत्त लिहीपर्यंत सुरू होती.
लाच मागणाऱ्या महसूल विभागातील लिपीकाला जेरबंद करताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राजेश पुरी, पोलीस अंमलदार संतोष शेटे, एकनाथ गंगातीर्थ, ईश्वर जाधव, मारोती सोनटक्के यांनी काम केले.
लाच लुुचपत प्रतिबंधक विभागाने आजची माहिती देताना जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तसेच त्याच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवर बोलणे असेल, ऑडीओ, व्हिडीओ असेल, एसएमएस असतील तसेच भ्रष्टाचार संबंधाने काही माहिती असेल तसेच माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती प्राप्त झाली असेल तर याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी टोल फ्रि क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02426-253512 आणि पोलीस उपअधिक्षक विजयडोंगरे यांचा मोबाईल क्रमांक 8975769918 यावर सुध्दा माहिती देता येईल तसेच एसीबी विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर आणि फेसबुक पेजवर सुध्दा याची माहिती देता येईल जनतेने भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही माहिती द्यावी असे आवाहन एसीबी विभागाने केले आहे.
