नांदेड

मातृभाषेतून ज्ञानाची होणारी उकल अधिक सुलभ आणि महत्वाची – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नांदेड (प्रतिनिधी)- बदलत्या काळानुरुप ज्ञानशाखा, विषय बदलत चालले आहेत. शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचेही महत्व वाढले आहे. अभियांत्रिकी, वैज्ञानिक व इतर क्षेत्राशी निगडीत असलेले शिक्षणाचे प्रवेशद्वार मातृभाषेतून उपलब्ध केल्यास प्रत्येक विषयातील होणारी सहज उकल विद्यार्थ्यांसाठी अधिक सहायभूत ठरेल. यात मातृभाषेच्या अभिनामासमवेत शिक्षणाचा होणारा विस्तार आणि विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणारा आत्मविश्वास लाखमोलाचा असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी तथा कुलपती श्री भगत सिंह कोश्यारी यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सिनेट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, प्रभारी कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांची उपस्थिती होती.
देशातील काही राज्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण आपआपल्या मातृभाषेतून सुरु केले आहे. यात महाराष्ट्राचाही सहभाग आहे. शिक्षणाच्यादृष्टिने काळानुरुप होणारे बदल हे विद्यापीठाने अंगिकारून विद्यार्थ्यांना तात्काळ तशा सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला पाहिजे. व्यवसायभिमूख अभ्यासक्रमांची अधिक जोड असेल तर स्वयंरोजगाराच्यादृष्टिने विद्यार्थ्यांना त्याची अधिक मदत होईल यादृष्टिकोणातून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सुरु केलेल्या अभ्यासक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
मराठवाडा ही संतांची भूमी आहे. श्री गुरु गोबिंदसिंघजी, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या योगदानातून ही भूमी पुनित झाली आहे. या भूमीला येऊन या संतांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासमवेत येथील नवनवीन प्रयोगाची पाहणी करता यावी, येथे जे काही चांगले आहे ते इतरत्र सांगता यावे या भूमिकेतून मला येथे उपस्थित राहतांना आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठातील विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. यात प्रामुख्याने जैवविविधता, जलपूनर्भरण, आरटीपीसीआर लॅब, क्रीडाक्षेत्र व उपक्रम याविषयी विस्तृत सादरीकरण केले. विद्यापीठातील प्राध्यापक व विभाग प्रमखांशीही त्यांनी संवाद साधला व अडचणी जाणुन घेतल्या. डॉ. राजाराम माने, डॉ. जगदीश कुलकर्णी, डॉ.  घनश्याम यळणे, डॉ. गजानन झोरे, डॉ. सिंकू  कुमार सिंह, व्यवस्थापन परिषद सदस्य परमेश्वर हासबे आदींनी राज्यपालांशी चर्चेत सहभाग घेतला. यानंतर राज्यपालांनी विद्यापीठातील परिसराला भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी केली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले तर प्रभारी कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी उपस्थितांचे आभार मानले.
———-
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी तख्त सचखंड श्री हुजूर साहिबजींचे दर्शन घेतले

राज्यामध्ये विविध ठिकाणी विकासाचे वेगवेगळे प्रकल्प सुरु आहेत. महाराष्ट्राच्या सेवेची संधी मिळाल्यानंतर माझा अशा प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देवून पाहणी करण्याचा, कुठे काही नवीन असेल तर ते शिकण्याचा व त्यांचा प्रसार करण्याचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. याचबरोबर महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. नांदेड ही यातील महत्वपूर्ण तीर्थस्थळापैकी एक आहे. श्री गुरु गोबिंद सिंघजी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीस माझी यायची मनोमन इच्छा होती. त्या इच्छेने मला इथे येता आले व तख्त सचखंड श्री हुजूर साहिबजी गुरुद्वारात जावून पायरीचे दर्शन घेता आले याचा मला मनस्वी आनंद असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. आपल्या नांदेड दौऱ्यात त्यांनी आवर्जून तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराची भेट देवून दर्शन घेतले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपाचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने उपस्थित होते. गुरुद्वाराच्यावतीने यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *