

नांदेड(प्रतिनिधी)-एका 23 वर्षीय विवाहितेने आज सकाळी 10 वाजेच्यासुमारास गोवर्धनघाट पुलावरून गोदावरी नदीत उडी मारली. तिने आपल्या मरणाची व्यथा एका वहित लिहुन पुलावर ठेवली होती. याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात त्या विवाहितेच्या सासऱ्याच्या मंडळींविरुध्द गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया वृत्तलिहिपर्यंत सुरू होती.
आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नांदेडच्या दौऱ्यावर आले होते. या निमित्ताने जागोजागी पोलीस होते. पण या घाई गडबडीत प्रत्येकाचे लक्ष भगतसिंह कोश्यारी यांच्या बंदोबस्तातच होते. सकाळी 10 ते 11 वाजेदरम्यान गोवर्धनघाट पुलावरून भगतसिंह कोश्यारी हे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाकडे गेले आणि त्यानंतर गोवर्धनघाट पुलावर कांही लोक फिरत असतांना एका 23 वर्षीय विवाहितेने अचानकच पुलावरून गोदावरी नदीत उडी मारली. क्षणार्धात खेळ संपतो तो असाच असतो. अनेकांनी त्या विवाहितेला उडी मारतांना पाहिले पण दुर्देवाने तिचा जीव वाचविण्यात कोणालाच यश आले नाही.
मयत विवाहितेचे नाव सोनम विक्की लिंबाळे (23) रा.अहमदपूर माहेर नवीन हस्सापूर नांदेड या महिलेने उडी मारण्याअगोदर एक वही आणि पेन सोबत आणली होती. तिने आपल्या मरणाची व्यथा त्या वहीत लिहिली आहे. ती वही आणि तो पेन वजिराबाद पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत. प्राप्त माहितीनुसार या विवाहितेला एक तीन वर्षाचा मुलगा पण आहे. ती सासरवाडी अहमदपूर येथे गुपचूप पळून आली होती आणि तिने आपला जीव गोदावरीच्या कुशीत टाकून दिला आहे. वृत्तलिहिपर्यंत या विवाहित महिलेचा नवरा, सासरा, सासू, दिर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती.