नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात सुरू असलेला “गॅंगवार’आजच्या स्थितीमध्ये स्वल्पविराम लागलेल्या अवस्थेत दिसत असला तरी उद्या यातून समाजासमोर काय येणार आहे. याचा आज कांही अंदाज बांधता येणार नाही. अत्यंत क्षुल्लक कारणासाठी सुरू झालेला हा गॅंगवार पुर्ण विरामाला कधी पोहचेल हे जाणून घेण्यासाठी वाट पाहण्या पलिकडे काही एक पर्याय नाही. पण जनतेची अपेक्षा अशी आहे की, या प्रकरणाला पुर्णविरामच लागावा तो लावण्याला पोलीसांना कितपत यश येते हे भविष्यातील कांही दिवसांमध्ये नक्कीच समोर येईल. गॅंगवार हा आपसातील प्रकार दिसत असला तरी प्रत्यक्षात त्यामध्ये सर्वसामान्य माणुसच भरडला जातो हे नाकरता येणार नाही.
2 ऑगस्ट 2020 रोजी गॅंगवारमधील पहिला खून विक्की चव्हाणचा झाला. जवळपास 11 महिने पुर्ण झाल्यानंतर 20 जुलै 2021 रोजी या प्रकरणातील दुसरा खून विक्की ठाकूर या युवकाचा झाला. विक्की चव्हाणचा खून झाला. तेंव्हा विक्की चव्हाणला त्या खूनाच्या जागी कोणी नेले होते. याची माहिती पोलीस तपासात आजही उघड झाली नाही. जवळपास 11 महिन्यानंतर दोन युवक तानाजी उर्फ ताना चव्हाण आणि सोमेश कत्ते यांना विक्की चव्हाणच्या खूनात अटक झाली. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यापुर्वी 14 जणांना अटक झाली होती. त्यातील एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे. आज तोच बालक विक्की ठाकूरच्या खून प्रकरणात वयात आलेला युवक म्हणून पोलीस कोठडीत आहे. विक्की चव्हाणच्या मारेकऱ्यांमधील मुख्य सुत्रधार कैलाश जगदीश बिघानीयाला अटक झाली तेंव्हा त्याचा भाऊ नितीन जगदीश बिघानीया सुध्दा पोलीसांच्या हाती लागला होता. पण कायद्याच्या दृष्टीकोणातून त्याच्याविरुध्द त्यावेळी कांही प्रकरण नव्हते म्हणून त्याला सोडावे लागले. सध्या कैलास बिघानीयासह 12 जण तुरूंगात आहेत आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक म्हणून सुटला आहे. आता त्यात दोघांची वाढ होणार आहे. सोबतच विक्की चव्हाणची हत्या झाली तेंव्हा हजर असलेला गंगाधर भोकरे नावाचा मारेकरी अद्याप पोलीसांना सापडलेला नाही. तो विक्की ठाकूरची हत्या झाली तेंव्हा सुध्दा त्या ठिकाणी हजर होता असे पोलीस प्राथमिकीमध्ये लिहिलेले आहे. या आरोपींची पोलीस कोठडी न्यायालयाने 1 ऑगस्टपर्यंत वाढवून दिलेली आहे. या प्रकरणाचा तपास इतवाराचे सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.एस.मुत्यपोड यांच्याकडे आहे. इतर आरोपींची पोलीस कोठडी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात वेगवेगळ्या दिवशी संपणार आहे. पोलीस तपासातील प्रक्रियेला अत्यंत बारकाईने आणि तांत्रिक दृष्टया प्रत्येक पोलीस तपासीक अंमलदाराने पुढे नेले तरच कधी तरी या गॅंगवारला पुर्णविराम लागेल. नसता अखंडपणे चालत असलेली ही प्रक्रिया पुढे सुध्दा सुरूच राहिल.
विक्की चव्हाणचा खून झाल्यानंतर मध्यंतरीच्या काळात या गॅंगने त्या गॅंगच्या युवकांना फेसबुकवर शिवीगाळ करणे, कार्यक्रमांमध्ये एक दुसऱ्याचा शोध घेणे, महिलांना शिवीगाळ करणे असे प्रकार घडले आणि याचा प्रकाराला पुढे गॅंगचे स्वरुप आले आणि त्याच्या परिणामात 20 जुलै रोजी विक्की ठाकूरचा खून झाला. हा खून करतांना मारेकऱ्यांनी मोठी शक्कल लढवली होती. प्रत्येकाने मुस्लीम व्यक्ती धारण करतो अशा टोप्या परिधान केल्या होत्या. त्यामुळे विक्की ठाकूरचा मृत्यू झाल्याबरोबर उठलेल्या अफवेत हिंदु-मुस्लीम दंगल माजण्याची वेळ आली होती. दुसऱ्या दिवशी दि.21 जुलै रोजी बकरी ईद हा सण होता आणि या पार्श्र्वभूमीवर नांदेडमध्ये जवळपास 3 तास ही चर्चा सुरू होती की, आपल्या युवकाला मुसलमान व्यक्तींने आपल्या गल्लीत घुसून त्याचा खून केला आहे. पोलीसंाचे आणि समाजाचे सुदैव या घटनेच्यावेळी विक्की ठाकूरच्या सोबत असणाऱ्या सुरज खिराडेने विक्की ठाकूर खून प्रकरणाची तक्रार दिली आणि त्यात एकही नाव मुस्लीम माणसाचे नव्हते. त्यामुळे शहरात दंगल माजविण्याचा मारेकऱ्यांचा डाव उधळला गेला. हे छान झाले. याबद्दल सुरज खिराडे आणि पोलीस विभाग या दोघांनाही समाजात दंगल माजली नाही यासाठी प्रत्येक नांदेडकराने धन्यवाद द्यायला हवे.
विक्की ठाकूरचा खून झाल्यानंतर त्याच्या मारेकऱ्यांना शोधणे हा एक मोठा प्रश्न पोलीस विभागासमोर होतो.त्यासाठी आपसात रस्सीखेच लागली होती. पण वरचढ ठरला स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर. त्यांनी आपल्या कुटूंबात असलेल्या परिस्थितीला दुर्लक्षीत करून आपल्यावर देण्यात आलेल्या जबाबदारीला पुर्ण करतांना आपल्या सहकारी अधिकारी आणि पोलीस अंमलदारांसह मारेकऱ्यांना पकडले. त्यात एकूण 8 जण आहेत. या 8 जणांची विभागणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यात विक्की ठाकूर खून प्रकरणात 5 आरोपी, विक्की चव्हाण खून प्रकरणात 2 आरोपी आणि बारड येथील पवार या व्यक्तीचा खून करण्यात 1 आरोपी अशी विभागणी करण्यात आली आहे. ते सर्व जण सध्या पोलीस कोठडीत आहेत. पण ते पुढे कधी तरी त्यांची पोलीस कोठडी संपेल, कधी तरी न्यायालय त्यांना जामीन देईल. म्हणजे पुन्हा एकदा नवीन पाढा सुरू होईल.
विक्की ठाकूरच्या मारेकऱ्यांना पकडल्यानंतर त्यातील मयुरेश कत्ते याच्या डाव्या हाताला गोळी लागली आणि ती गोळी विक्की ठाकूरचा मित्र निखील उर्फ कालू मदनेने चालवली अशी तक्रार मयुरेश कत्तेने दिली. त्यावेळी त्यासोबत ईश्र्वरसिंघ आणि सुरज खिराडे ज्याने विक्की ठाकूरच्या खूनाची तक्रार दिली ते सुध्दा हजर होते. अशा या तक्रारीत लिहिलेले आहे. त्यानुसार पोलीसांनी या तिघांनाही अटक केली. ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.
पोलीस कोठडीत असणाऱ्या लक्की मोरे या गुन्हेगाराचे तर पोलीस कोठडीत असतांना फेसबुक अकाऊंट सुरू आहे आणि त्या फेसबुक अकाऊंटवर लक्की मोरेच्या हातात पिस्तुल असलेले फोटो अपलोड केले जात आहेत. याचा अर्थ साधा आहे की, लक्की मोरे हा आज पोलीस कोठडीत असला तरी त्याची जरब निर्माण करण्यासाठी फेसबुक अकाऊंडवर अशा प्रकारचे फोटो अपलोड केले जात आहेत. असेच घडणार असेल तर पोलीसांच्या सायबर विभागाने लक्की मोरेचे फेसबुक अकाऊंट कोठून हाताळले जात आहे याचा शोध घेण्याची गरज आहे. म्हणजे त् याच्या माघारी सुध्दा त्याची जरब कोण निर्माण करत आहे हे समोर येईल. सोबतच पोलीसांनी सुध्दा सध्या अटकेत असलेल्या आरोपींची ने आण करतांना व्हिडीओ बनविणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. कारण त्यांचे व्हिडीओ बनवून ते सोशल मिडीयावर अपलोड केले जातात आणि आमचा “भाई’ किती भारी आहे हे दाखविण्याचा प्रयत्न होतो.
पोलीस कोठडीत असतांना दोन गॅंगच्या लोकांना वेगवेगळ्या पोलीस कोठडीत ठेवून पोलीसांनी एक चांगली कामगिरी केली. पण पुढे हे सर्व एकत्रच तुरूंगात जाणार आहेत. त्या ठिकाणी तुरूंग अधिकाऱ्यांनी सुध्दा या गॅंगवारला लक्षात ठेवून कोणाला कोठे ठेवायचे याचा निर्णय घेणे आवश्यक आहे. नाही तर भारतात अनेक ठिकाणी तुरूंगात सुध्दा गॅंगवार समोर आलेले आहेत. जगात सुध्दा असे घडलेले आहे मग ते नांदेडमध्ये का घडणार नाही याचा विचार होण्याची गरज आहे.
या दोन गॅंगमधील लोकांचा अभ्यास केला असता छोटे-छोटे गुन्हे करून त्यातून पैसे कमावणे आणि मी किती मोठा “भाई’ आहे हे दाखविण्यात ते आपले वर्चस्व तयार करतात आणि या वर्चस्वाचा फायदा घेतांना सर्व सामान्य नागरीकांना वेठीला धरतात. नुसते हेच भाई असलेले गुन्हेगार असे करतात असेही नाही अनेक व्हाईट कॉलर क्रिमिनल या जगात आहेत, नांदेडमध्ये सुध्दा आहेत. पण त्यांचे नाव गुन्हयांमध्ये कधी गोवले गेले नाही यावर सुध्दा पोलीस विभागाने कांही तरी करण्याची गरज आहे. पोलीस एक असा विभाग आहे ज्याची दुकान 24 तासांसाठी उघडी आहे. या दुकानाला कधीच कुलूप लावले जात नाही आणि त्रासलेली सर्वसामान्य जनता त्यांच्याशिवाय दुसरीकडे जाऊ पण शकत नाही. ज्यांनी पोलीस विभागाची नोकरी आपल्या अभ्यासाच्या जोरावर मिळवली आहे. त्यांनी पोलीसांचे खरेच काम केले पाहिजे. नाही तर, “पेटता पेटता बोलली रे चिता, जा मुलांनो संपली रे कथा’ हे शब्द आठवल्या शिवाय राहणार नाहीत.
