नांदेड(प्रतिनिधी)-29 मार्च रोजी दाखल झालेल्या 3 गुन्ह्यांमधील एका गुन्ह्यात एक आरोपी वजिराबाद पोलीसांनी पकडल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी योगेशकुमार रहांगडाले यांनी त्यास 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.29 मार्च 2021 रोजी गुरूद्वारा परिसरापासून सुरू झालेल्या वादातीत प्रकरणांबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 113, 114 आणि 115 असे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. त्यात गुन्हा क्रमांक 115 ची तक्रार पोलीस उपनिरिक्षक भाऊसाहेब मगरे यांनी दिली आहे. त्यात त्यांनी मला आणि इतर पोलीसांना शासकीय काम करतांना हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असा या तक्रारीचा आशय आहे. या अगोदर पोलीसांनी एक व्यक्तीला गुन्हा क्रमांक 115 मध्ये अटक केली होती.
दुसरा या प्रकरणातील व्यक्ती कुलदीपसिंग अंगदसिंग जुन्नी (20) रा.साकला प्लॉट परभणी यास अटक केली. वजिराबादचे पोलीस निरिक्षक दत्तात्रय निगम, पोलीस अंमलदार बालाजी लामतुरे, प्रदिप कांबळे आणि इतर पोलीस अंमलदारांनी कुलदिपसिंघ जुन्नीला न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड. सीमा जोहिरे यांनी आरोपीला पोलीस कोठडी देण्यासाठी अनेक मुद्दे न्यायालयासमक्ष मांडले. आरोपीच्यावतीने ऍड.रामसिंघ मठवाले यांनी पोलीस कोठडी देण्यासारखे प्रकरण नाही असे सांगितले. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश योगेशकुमार रहांगडाले यांनी कुलदिपसिंघ जुन्नीला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
