नांदेड(प्रतिनिधी)- आरोपी असलेल्या माणसाचे नाव कमी करून दुसऱ्याचे नाव जोडणे, एकूण आरोपीपैकी कांही नावे कमी करणे हा भाग पोलीस दलात नेहमीच चालत असतो. पण छोट्याशा जुगार अड्यासाठी एका सहाय्यक पोलीस निरिक्षकाला निलंबित करणाऱ्या पोलीस उपमहानिरिक्षकांच्या परिक्षेत्रात, त्यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या पोलीस ठाण्यात सुध्दा असे घडत असेल तर नांदेड पासून 150 किलो मिटर दुर असलेल्या पोलीस ठाण्यात काय चालत असेल यावर शोध घ्यावा लागेल.
एखादी तक्रार पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करणे हे अधिकार फौजदारी प्रक्रिया संहितेने पोलीसांना दिले आहेत. त्यानुसार त्यांनी कार्यवाही करावी फिर्याद चुक असेल तर फिर्यादीवर सुध्दा पोलीसांना गुन्हा दाखल करता येतो अशी सोय फौजदारी प्रक्रिया संहितेत दिलेली आहे. पण सर्व कांही फौजदारी प्रक्रिया संहितेनेच चालत नसते त्यात अनेक मांडवली होत असतात. या मांडवली करतांना पोलीस एकूण आरोपींपैकी कांहीची नावे कमी करतात, कांही ठिकाणी आरोपी बदलला जातो अशा अनेक घटना होत असतात. एखाद्या अपघाताच्या प्रकरणात गाडीचा चालक बदलणे मान्य करता येईल कारण त्या चालकाकडे वाहन चालक परवाना नसेल तर त्या अपघातात जखमी अथवा मयत झालेल्या व्यक्तीला मदत मिळणे अवघड होते. पण एखाद्या गुन्ह्यात 11 आरोपी असतील तर त्याचे 7 आरोपी केले जात असतील तर त्या मागचे गौड बंगाल शोधायला पाहिजे. ही जबाबदारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तोंडी आदेशाने पोलीस निरिक्षक असलेल्या सन्माननिय श्री अशोकरावजी घोरबांड यांच्या पोलीस ठाण्यात दि.22 जुलै रोजी छावा संघटनेने एका घटनास्थळी बैल कापले जात आहेत आणि ते बैल जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असलेला व्यक्ती करत आहे अशी माहिती नांदेड ग्रामीण पोलीसांना दिली. पोलीसांनी त्वरीत प्रभावाने त्या ठिकाणी असलेले दोन बैल पकडून आणले आणि छावा संघटनेने सांगितलेल्या शिक्षकाला पण आणले.त्यात पोलीसांकडून पाकीटे मागणाऱ्या कांही बोरुबहाद्दरांनी उडी घेतली आणि शिक्षकाचे नाव कमी करतांना पाकीट घेणाऱ्यांनी पाकीट दिले आणि अशा प्रकारे कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड यांच्या पोलीस ठाण्यात आरोपीचे नाव बदलण्याची प्रक्रिया घडली अशी खात्रीलायक माहिती आहे.
त्याच रात्री नांदेड ग्रामीण पोलीसांनी मोठी कार्यवाही केल्याचा आव आणत 40 किलो गांजा पकडला. मुळात माहिती एकाची, कार्यवाही केली एकाने त्यात 11 लोकांना पोलीसंानी ताब्यात घेतले होते. या सर्व लोकांना अगोदर नांदेडच्या इतवारा पोलीस ठाण्यात आणले. ही बाब तर त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलीसांनी एका गाडीतून 40 किलो गांजा जप्त केला आणि 11 पैकी 4 नावे कमी करून एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह सात आरोपी कमी करण्यात आले. याबाबतची प्रेसनोट देतांना फोटो काढण्यात आला. हा फोटो काढतांना पाऊस पडत होतो म्हणून राजाजींचा बचाव त्या पावसाकडून व्हावा म्हणून एका सेवकाने राजाजींच्या डोक्यावर छत्री धरली होती. इतर लोक मात्र पावसात भिजत फोटो काढत होते.
पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी आणि पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. परिक्षेत्राचा कारभार चालवतांना निसार तांबोळी यांना असणाऱ्या अडचणी आणि जिल्ह्याचा कारभार चालतांना प्रमोदकुमार शेवाळे यांना असणाऱ्या अडचणी खऱ्याच आहेत. कांही दिवसांपुर्वी या दोन्ही अधिकाऱ्यांनी तीन दिवसात एक जबरदस्त गुप्त मोहिम राबवून एक मोठी कार्यवाही केली. मग पोलीस उपमहानिरिक्षकांच्या कार्यालयाच्या अगदी जवळ असणाऱ्या पोलीस ठाण्यात सलग दोन दिवस असे प्रकार घडल्याची ही खात्रीलायक माहिती अधिकाऱ्यांनी तपासण्याची गरज आहे.