नांदेड(प्रतिनिधी)-विक्की ठाकूर खून प्रकरणात इतवारा पोलीसंानी आज न्यायालयात हजर केलेल्या पाच जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी चार दिवस, अर्थात 2 ऑगस्ट 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.20 जुलै रोजी गाडीपुरा भागात विक्की दशरथसिंह ठाकूर (32) या युवकाचा मारेकऱ्यांनी डोक्यात गोळी झाडून आणि त्यावर तलवारीने प्रहार करून खून केला होता. त्यावेळी त्या भागात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सात जण तीन दुचाकी गाड्यांवर पळून जातांना दिसतात. या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 176/2021 सुरज भगवान खिराडे याच्या तक्रारीवरुन दाखल केला. या तक्रारीत दोन महिलांसह आठ जणांची नावे आहेत.
सर्व प्रथम अंजली नितीन बिघानीया, ज्योती जगदीश बिघानीया या दोन महिलांना अटक झाली. सध्या त्या तुरूंगात आहेत. त्यानंतर काल स्थानिक गुन्हा शाखेने त्या प्रकरणात आठ जणांना अटक केली. त्यातील नितीन जगदीश बिघनीया(32), मुंजाजी उर्फ जब्या बालाजी धोंगडे(19), कृष्णा उर्फ किन्ना छगनसिंह परदेशी(20), दिगंबर उर्फ डिग्या टोपाजी काकडे (28), मयुरेश सुरेश कत्ते (20) या पाच जणांना आज दि.29 जुलै रोजी या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार साहेबराव नरवाडे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार यांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयात सरकारी वकील ऍड. मोहम्मद रजियोद्दीन यांनी या प्रकरणातील गांभीर्य न्यायालयासमक्ष मांडून पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. न्यायाधीश प्रविण कुलकर्णी यांनी या चार जणांना 2 ऑगस्ट पर्यंत अर्थात 4 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
आठ आरोपींची विभागणी तीन पोलीस ठाण्यात
पकडलेल्या आठ मारेकऱ्यांना स्थानिक गुन्हा शाखेने वेगवेगळे अहवाल तयार करून तीन पोलीस ठाण्यांमध्ये या मारेकऱ्यांची विभागणी केलेली आहे. कारण त्यांच्याविरुध्द अनेक ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत.पकडलेल्या आठ पैकी पाच ईतवारा पोलीस ठाण्यात, दोन विमानतळ पोलीस ठाण्यात आणि एक बारड पोलीस ठाण्यात अशा प्रकारे पकडलेल्या मारेकऱ्यांची विभागणी करून त्यांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आली आहे.
