एकाच्या हातातून गोळी आरपार गेली;तीन जणांना दोन दिवस पोलीस कोठडी
नांदेड(प्रतिनिधी)-विक्की ठाकूर खून प्रकरणात अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे.मारेकऱ्यांना सुध्दा गोळी मारण्यात आली होती. त्याची तक्रार आज एका मारेकऱ्याने दिल्यानंतर विक्की चव्हाण मित्रमंडळाच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात जखमीच्या हातातून पिस्तुलाची गोळी आरपार झालेली आहे. या प्रकरणातील तीन जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी दोन दिवस, 31 जुलै 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
20 जुलै रोजी विक्की ठाकूरचा खून करण्यासाठी आलेल्या सात मारेकऱ्यांपैकी मयुरेश सुरेश कत्ते याच्या हातात विक्की ठाकूरच्या मित्रांपैकी कोणी तरी गोळी झाडली ती गोळी त्याच्या हातातून आरपार निघून गेली आहे. हा घटनाक्रम स्थानिक गुन्हा शाखेने या मारेकऱ्यांना पकडल्यानंतर समोर आला. यावरून दोन्ही गॅंग एक दुसऱ्याचा खून पाडण्याच्या तयारीतच होते हे स्पष्टपणे दिसले. काल मारेकरी आणल्यानंतर त्यातील मयुरेश सुरेश कत्तेने दिलेल्या तक्रारीनुसार विक्की ठाकूरचा खून करतांना निखील उर्फ कालु मदनेने त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला ती गोळी त्याच्या हातातून आरपार झाली. माझ्यावर हल्ला करण्याच्या कटात सुरज भगवान खिराडे (39), ईश्र्वरसिंघ जसवंतसिंघ गिरणीवाले (24) आणि मयत विक्की दशरथसिंह ठाकूर(32) असे इतर जण पण सहभागी आहेत.
2 जुलै रोजी न्यायालयात घडलेल्या भांडण प्रकरणात विक्की ठाकूर व त्याच्या सहकाऱ्यांनी नितीन बिघानीयाच्या कुटूंबियांना शिवीगाळ केली होती त्याचा जाब विचारण्यासाठी मी व माझ्या सोबत सात जण नावघाट मार्गे बर्की चौकात आलो होतो त्यावेळी गाडीपुरा भागात विक्की ठाकूरची भेट झाली आणि त्यावेळी विक्की ठाकूरने मला मारलेली गोळी माझ्या डाव्या हाताच्या पंजाच्या आरपार गेली होती. त्यावेळी निखिल उर्फ कालु प्रकाश मदनेच्या भितीमुळे तक्रार दिली नव्हती आज ती देत आहे असे मयुरेश सुरेश कत्तेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
इतवारा पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 307 नुसार गुन्हा क्रमांक 182/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.एस.मुत्येपोड यांच्याकडे देण्यात आला आहे. मारेकऱ्यांनी विक्की ठाकूरचा खून केला तेंव्हा विक्की ठाकूरच्या मित्रांनी सुध्दा आपल्या मित्राला वाचविण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांनी सुध्दा गोळीबार केला ही एक धक्कादायक बाब मारेकऱ्यांना अटक केल्यानंतर समोर आली आहे.
न्यायालयात निखील उर्फ कालू प्रकाश मदने (35), सुरज भगवान खिराडे(39), ईश्र्वरसिंघ जसवंतसिंघ गिरणीवाले(24) या तिघांना हजर करण्यात आले.सरकारी वकील ऍड. मोहम्मद रजियोद्दीन यांनी घडलेला प्रकार, गॅंगवार आणि त्यातील गांभीर्य न्यायालयासमक्ष मांडल्यानंतर न्यायाधीश प्रविण कुलकर्णी यांनी तिघांना दोन दिवस, 31 जुलै 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
