नांदेड(प्रतिनिधी)-विक्की चव्हाण खून प्रकरणातील एक मारेकरी काल बारड पोलीसांनी अटक केला. त्यास मुदखेडचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मंगेश बिरहारी यांनी सिध्दार्थ ढेंबरे यांनी 10 दिवस, 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.17 मे 2021 रोजी रात्री सकाळी 11 वाजता बारड येथील शिवाजी पुतळा जवळच्या ऍटो रिक्षा पॉईंट जवळ थांबलेल्या देविदास माधव पवार (35) रा.निवघा ता.मुदखेड याला सहा जणांनी दुचाकींवर बसवून उचलून नेले आणि मुक्त्यारपुर शिवारात बाळासाहेब देशमुख इंगोले यांच्या शेतात देविदास पवारच्या शरिरावर पिस्तुलातून गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी बारड पोलीस ठाण्यात 54/2021 हा गुन्हा कामाजी माधव पवार यांच्या तक्रारीवरुन दाखल झाला होता. या प्रकरणात बारड पोलीसांनी आकाश बालाजी पवार (30), किशन मारोती पवार (26) दोघे रा.निवघा ता.मुदखेड, हनुमान कोंडीबा पल्लेवाड (23) रा.मुदखेड, ज्ञानेश्र्वर ईरबाजी जाधव (24) रा.माळकौठा ता.मुदखेड, शिवानंद उर्फ सचिन साहेबराव पुयड (23) रा.पुयडवाडी या पाच जणांना पकडले होते. या प्रकरणातील मुख्य मारेकरी लक्ष्मण उर्फ लक्की बालाजी मोरे रा.मुदखेड हा त्यावेळी सापडला नव्हता. या प्रकरणाबद्दल असे सांगतात की, मयत देविदास पवार यांना पैशाची मागणी करण्यात आली होती ती पुर्ण न झाल्याने त्यांचा खून करण्यात आला. लक्की उर्फ लक्ष्मण मोरेने बारड, मुदखेड परिसरात अनेकांना कॉल करून पैशांची मागणी केली होती. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रासलेलीच होती.
स्थानिक गुन्हा शाखेने पकडलेल्या आठ मारेकऱ्यांमध्ये लक्ष्मण उर्फ लक्की बालाजी मोरे यालाही पकडण्यात आले. बारड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.आर.तुगावे यांनी लक्की मोरेला काल अटक केली. बारड येथील गुन्हा क्रमांक 54/2021 मध्ये मकोका कायद्या जोडावा असा प्रस्ताव अगोदरच पाठवलेला आहे.
आज सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.आर.तुगावे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार किडे, अजहर आणि पवार यांनी लक्ष्मण उर्फ लक्की मोरेला न्यायालयात हजर करून तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती केली ती मान्य करत न्या.मंगेश बिरहारी यांनी लक्की मोरेला दहा दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
