क्राईम

जमीर बेगचे मारेकरी पकडतांना वजिराबाद पोलीसांनी केला गोळीबार

नांदेड(प्रतिनिधी)-7 जुलै रोजी जमीर बेग या रिक्षा चालकाला गंभीर मारहाण करून त्याचा खून करणाऱ्या आरोपीला पकडतांना वजिराबाद येथील गुन्हे शोध पथकाने आपल्या पिस्तुलातून एक गोळी झाडली. आरोपींना पकडण्यात पोलीसांना यश आले आहे. आरोपीला पळवून नेणाऱ्या पैकी एकाला गोळी लागली असेल अशी शक्यता आहे. आरोपीला पळवणारे तिघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
दि.7 जुलै रोजी जिजामाता हॉस्पीटलजवळ रिक्षा चालक जमीर बेग यास दोन जणांनी जबर मारहाण केली. त्याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुध्द जिवघेणा हल्ला या सदरात गुन्हा दाखल झाला. उपचारादरम्यान जमीर बेगचा मृत्यू झाला. वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या नेतृत्वात वजिराबाद पोलीसांनी जमीर बेगला मारणाऱ्या आरोपींची ओळख पटवली आणि त्यांचा शोध सुरू केला.
जमीर बेगला मारणारा सोनुसिंग उर्फ सोनु भोंग राजेंद्रसिंग चव्हाण (20) रा.भगतसिंघ रोड नांदेड आणि त्याच्यासोबत एक विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याची माहिती पोलीसांना प्राप्त झाली. आज सकाळी सोनु भोंगला शोधण्यासाठी वजिराबादचे पोलीस पथक सखोजीनगर येथे एका घरात गेले होते. पण तेंव्हा पोलीसंाना खंजीर दाखवून सोनु भोंग आणि त्याच्यासोबतचा विधीसंघर्षग्रस्त बालक पळून गेले.

त्यांच्या माग काढत पोलीसांनी माळटेकडी येथे त्यांना आपल्या आवाक्यात आणले. त्यावेळी सोनु भोंगला घेवून जाण्यासाठी एका दुचाकी गाडीवर तीन जण आले होते. घातक हत्यारांसह या सर्वांनी पोलीसांवर हल्ला केला तेंव्हा एका पोलीस अंमलदाराने आपल्याकडील बंदुकीतून एक गोळी झाडली. ती सोनु भोंगला पळवून नेणाऱ्या तिघांपैकी एकाला लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अशा परिस्थितीत सुध्दा वजिराबादच्या पोलीस पथकाने जमीर बेगला मारणाऱ्या सोनु भोंग आणि त्याचा सहकारी अल्पवयीन बालक यांना पकडलेच. ही कार्यवाही करणाऱ्या पथकामध्ये पोलीस उपनिरिक्षक अब्दुल रब, उत्तम वरपडे, पोलीस अंमलदार दत्ता जाधव, संतोष बेल्लूरोड, विजयकुमार नंदे, चंद्रकांत बिरादार, व्यंकट गंगुलवार, बालाजी कदम यांचा समावेश होता.
काल दि.26 जुलै रोजी कॉंगे्रस पक्षाचे अनेक नगरसेवक जमीर बेगच्या घरी गेले होते त्यानंतर त्यांनी पोलीस अधिक्षकांची भेट घेतली होती आणि जमीर बेगच्या मारेकऱ्यांना जेरबंद करण्याची विनंती केली होती. 24 तास पुर्ण होण्याअगोदरच वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाने जमीन बेगच्या मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी वजिराबाद पोलीसांचे कौतुक केले आहे.
—-
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *