नांदेड शहरात वाहतुकीचा प्रश्न हा नेहमीच ऐरणीवर असतो. जनतेला सुध्दा मोटार वाहन कायद्याची पायमल्ली करुन मी किती हुशार आहे. हे दाखविण्यात मर्दुंमकी वाटते. कांही गुंडच असतात त्यांना तर वाहतुकीच्या नियमांना मोडणे म्हणजे कांही तरी दिव्य केल्यासारखे वाटते. अशा परिस्थितीत वाहतुक शाखेकडे पोलीस बळाची कमी संख्या शहरात अनेक जागी वाहतुकीची कोंडी स्पष्ट करते. वाहतुकीचा मार्ग सुरळीत राहणे, तो राखणे वाहतुक शाखेची जबाबदारी आहे. सर्वसामान्य माणसाला त्रास होवू नये यासाठीच कायदा आहे. त्याची अंमलबजावणी करतांना त्या सर्व सामान्य माणसाला केंद्र बिंदु मानले जावे असे निर्देश भारतीय राज्य घटनेत आहेत.
आज अचानकच फिरत असतांना एक वाहतुक पोलीस अंमलदार शहर पोलीस उपअधिक्षक कार्यालयात दिसला. विचारणा केली असता कांही दिवसांपासून या ठिकाणी वाहतुक शाखेच्या दोन पोलीसांची ड्युटी असल्याचे त्याने सांगितले. या मागील गमक शोधले असता पोलीस उपअधिक्षकांची गाडी कार्यालयात येतांना आणि जातांना तिला अडथळा येवू नये म्हणून अशी ड्युटी लागल्याचे स्पष्ट झाले. पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय येथे असा विशेष पोलीस अंमलदार नियुक्त केलेला नाही. त्यामुळे, “आले राजाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना’ या उक्तीचा प्रत्यय आला.
