नांदेड (प्रतिनिधी) – ‘घर का भेदी लंका ढाये’ या म्हणीप्रमाणे 20 जुलै रोजी झालेल्या विक्की ठाकूर खून प्रकरणात त्याचा मित्रच मारेकऱ्यांचा माहितगार असावा अशी शंका आज इतवारा उपविभागातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी निखील उर्फ कालू मदनेे या युवकाला ताब्यात घेतल्यानंतर यायला लागली आहे. मागे विक्की ठाकूरचा मित्र विक्की चव्हाणचा खून झाला होता. त्या प्रकरणात सुद्धा असाच कोणी घरातील भेदी आहे का ? याचा शोध पोलिसांनी घेण्याची गरज आहे.
20 जुलै रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास गाडीपूरा भागात विक्की दशरथसिंह ठाकूर या 32 वर्षीय युवकाचा बंदुकीने गोळ्या मारून आणि तलवारीने त्याच्या शरीरावर घाव करून खून झाला. पोलिसांनी या प्रकरणात आठ लोकांविरूद्ध सुरज भगवान खिराडे नावाच्या विक्की ठाकूर याच्या मित्राची तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सर्वप्रथम ज्योती जगदीश बिघानीया आणि अंजली नितीन बिघानीया या दोन महिलांना अटक झाली. आज दि. 26 जुलै रोजी या दोन महिलांना न्यायालयाने पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.
या प्रकरणी आज दुपारनंतर इतवारा उपविभागातील अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार एकत्रीतपणे शिवाजीनगर भागात वावरत होते. प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार विक्की ठाकूरचा खून झाला. त्यादिवशी त्याच्यासोबत असलेल्या निखीत उर्फ कालू प्रकाश मदने (30) या युवकाला ताब्यात घेतले आहे. कालू मदने विक्की ठाकूरचा खून झाला त्यादिवशी त्याच्यासोबत होता. घटनेच्या काही वेळापुर्वी लक्की मोरे नावाचा मारेकरी विक्की ठाकूर, कालू मदने आणि सुरज खिराडे या तिघांनी पाहिला होता आणि त्यानंतर कालू मदने आपल्या घरात गेला आणि याच क्षणामध्ये मारेकऱ्यांनी विक्की ठाकूरला गाठले, तो पळू लागला, पळता पळता पडला तेव्हा मारेकऱ्यांनी त्याच्या डोक्यावर बंदूक ठेऊन गोळी झाडली. त्यानंतर तलवारीने त्याच्या शरीरावर अनेक वार केले आणि मग पळून गेले. त्या दिवशीच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एकूण तीन दुचाकी गाड्या होत्या. त्या तीन दुचाकी गाड्यांवर सात जण होते.
आज पोलिसांनी निखील उर्फ कालू प्रकाश मदनेला ताब्यात घेतल्यानंतर असे लिहावेसे वाटते की, ‘पहले अपनोसे बचो, गैरोसे फिर भी निपट लेंगे’, कारण निखील उर्फ कालू मदने विक्की ठाकूरच्या वास्तव्याची खबर बिघानीया गॅंगला दिली असेल तर तो आपल्या घराचे वासे फिरवणारा ठरणार आहे. आज निखील मदने पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांच्या चौकशीतून काय बाहेर येईल हे लवकरच कळेल. पण मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखण्याची या निमित्ताने गरज लिहावीशी वाटते.