नांदेड(प्रतिनिधी)-माहूर येथे एक जबरी चोरी झाली आहे. माहूरमध्येच दुसरी घरफोडी झाली आहे. किनवट येथे रेल्वे विभागाचे साहित्य चोरीला गेले आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दुचाकी गाडी चोरीला गेली आहे. या चार चोरी प्रकारांमध्ये 91 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
सागर उर्फ गोपु सुधीर महामुने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माहुर येथील मथुरा लेआऊट, कृष्णा पॅलेस येथे ते राहतात. 27 जून रोजी मध्यरात्री चार चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला आणि त्यांच्या आई जवळील 20 हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. सागर महामुनेने प्रतिकार केला असता त्यांच्या छातीवर दांडक्याने मारहाण करून त्यांना जखमी केले. माहूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक पवार हे अधिक तपास करीत आहेत.
माहुर येथील प्राथमिक शाळा हरडफ येथे शिक्षक असलेले सचिन आनंदराव शहाणे यांच्या साई लेआऊट येथील घरात 24 जुलै रोजी मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते 4 वाजेदरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घर फोडून घरातील टी.व्ही.घड्याळ आणि 5 ग्रॅमची अंगठी असा 42 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. माहूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार आडे हे अधिक तपास करीत आहेत.
केदारनाथ जगन्नाथराव रॉय यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 जुलैच्या सायंकाळी 7.30 ते 23 जुलैच्या पहाटे 3.10 वाजता दरम्यान मौजे कोठारी ता.किनवट येथील रेल्वेचे कॉपर ईलेक्ट्रीक वायर 14 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी चोरून नेले आहे. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कोठेवाड हे अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसबीआय बॅंकेच्या शेजारी चंदासिंघ कॉर्नर येथून हणमंत धोंडीबा उपासे यांची 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.बी.2144 दि.17 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता चोरी गेली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दालख केला असून पोलीस अंमलदार संभाजी व्यवहारे अधिक तपास करीत आहेत.