नांदेड (प्रतिनिधी)- दि. 6 जुलै रोजी अज्ञात हल्लेखोराच्या मारहाणीने मरण पावलेल्या जमीर बेग यांच्या कुटूंबियांना भेटून कॉंग्रेस नगरसेवकांनी 55 हजार रूपयंाची आर्थिक मदत केली. सोबतच पोलीस अधीक्षकांना भेटून जमीर बेगचे मारेकरी शोधण्याची विनंती केली. या संदर्भाने वजिराबादचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी सांगितले की, आम्ही आरोपींना ओळखले आहे, लवकरच त्यांना जेरबंद करणार आहोत.
दि. 6 जुलै रोजी जिजामाता हॉस्पीटलजवळ रिक्षाचालक जमीर बेग यास रात्री 9.30 वाजता काही जणांनी मारहाण केली. जखमी अवस्थेत त्याच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू होते. सुरूवातीला त्याने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात हल्लेखोरांविरूद्ध जीवघेणा हल्ला या सदराखाली गुन्हा दाखल झाला. त्यानंतर उपचारादरम्यान जमीर बेग यांचा मृत्यू झाला. त्यामुळे हा गुन्हा खुनाच्या सदरात बदलला.
आज दि. 26 जुलै रोजी मनपाचे उपमहापौर मसुद अहेमद खान, माजी महापौर अब्दुल सत्तार, नगरसेवक शेर अली, फारूख अली खान, अब्दुल गफार, मोहम्मद अलीम खान, फारूख बदवेल, वाजीद जहागीरदार, अब्दुल हबीब बागवान, बाबू खान, अथर हुसेन, शोएब हुसेन, अब्दुल फहीम यांनी जमीर बेग यांच्या घरी भेट दिली आणि त्यांच्या कुटूंबियांना 55 हजार रूपये रोख मदत केली.
त्यानंतर हे सर्व शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांना भेटले आणि जमीर बेगच्या मारेकऱ्यांना त्वरीत अटक करण्याची विनंती केली. या संदर्भाने वजिराबादचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, हा गुन्हा अगोदर अज्ञात हल्लेखोरांविरूद्ध दाखल झाला होता. पण आता आम्ही या हल्लेखोरांची ओळख पटवली आहे आणि आम्ही त्यांना लवकरच जेरबंद करू.