
नांदेड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्ह्यात समर्थ बुथ व ओबीसी जागरण अभियान सुरु केले आहे. या अभियानाची आढावा बैठक भाजपाचे मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे घेण्यात आली. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खा.चिखलीकर हे बोलत होते. या बैठकीस नांदेड जिल्हा भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर व महानगराध्यक्ष प्रविण साले, आ. राम पाटील रातोळीकर, आ. तुषार राठोड, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. प्रणिताताई देवरे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप तांदळे, राम नागरे, माजी आ.अविनाश घाटे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. चित्ररेखा गोरे, भाजपाचे सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर, श्रावण पाटील भिलवंडे, लक्ष्मणराव ठक्करवाड, डॉ. माधवराव उच्चेकर, शिवराज पाटील, डॉ. अजित गोपछडे, राम भारती महंत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आघाडीचे प्रमुख, बुथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा. चिखलीकर म्हणाले, कार्यकर्त्यांच्या बळावरच नांदेड जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला बनत आहे. धनशक्तीच्या जोरावर निवडणूका जिंकण्याचे काँग्रेसचे दिवस आता संपल्यात जमा झाले आहे. आगामी देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणूकीतही भाजपाचा विजय हा निश्चित आहे. जिल्ह्यात समर्थ बुथ अभियानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पक्षाने 2 हजार 322 बुथ संघटनेची मजबूत फळी निर्माण केली आहे. जिल्ह्यात 465 शक्ती केंद्राची रचना तयार करण्यात आली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात भाजपा पक्ष संघटनेची ताकद जोमाने वाढत आहे. समर्थ बुथ अभियान 6 जुलैपासून सुरु करण्यात आले असून हे अभियान 17 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश भाजपाने मजबुत समर्थ बुथ अभियान भेट देण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी नांदेड जिल्ह्यात मजबूत बुथ संघटना तयार करुन पक्षाला बळ देण्याचे काम आपणा सर्वांना करायचे आहे असे आवाहन त्यांनी केले.
मराठा आरक्षणावर संसदेत आवाज उठविण्यासाठी भाजपाचा प्रत्येक खासदार सक्षम आहे. स्वत:च्या नाकर्तेपणावर पांघरुन घालण्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी आता भाजपा खासदारांना पत्र देवून मराठा आरक्षणावर आवाज उठविण्याचा शहाणपणा सुरु केला आहे. जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्वाला सत्ता,संपत्तीचा माज आलेला आहे. निवडणुक आली की पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचे काँग्रेसचे दिवस आता संपले आहेत. जनाधार असलेला भाजपा पक्ष आता मैदानात उतरला आहे. नांदेड जिल्ह्याने भाजपाचा खासदार दिल्यामुळे नांदेड-बिदर रेल्वे मार्ग मंजूर झाला. गेल्या 30 वर्षापासून नांदेड ते मुंबई रेल्वे सुरु करण्याची प्रलंबित मागणी भाजपाच्या खासदाराने पूर्ण करुन दाखविली आहे. सत्ताधारी काँग्रेसच्या कुचकामी नेतृत्वामुळे नांदेड जिल्हा हा पिकविम्याच्या लाभापासून वंचित राहिला आहे, ही लाजीरवाणी बाब असल्याची टीकाही खा.चिखलीकर यांनी ना.अशोकराव चव्हाण यांचे नांव न घेता केली.
यावेळी भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री भाऊराव देशमुख, आ.राम पाटील रातोळीकर, आ.तुषार राठोड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा चित्ररेखा गोरे, सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, लक्ष्मणराव ठक्करवाड, डॉ.माधवराव उच्चेकर आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी भाजपाचे सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर यांनी आभार मानल्यानंतर बैठकीची सांगता झाली.