क्राईम

जिल्ह्यात सात चोरी प्रकारात 11 लाख 18 हजार 365 रुपयांचा ऐवज लंपास

बसमध्ये मुलींनी चोरी केली, 64 वर्षीय महिलेचे गंठण तोडले, शाळा फोडली
नांदेड(प्रतिनिधी)-माहूर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 7 लाख 19 हजारांचा ऐवज चोरला आहे. महाटी-येळी रस्त्यावर 97 हजारांची जबरी चोरी झाली आहे. दोन मुलींनी मिळून बसमध्ये 1 लाख रुपयांची चोरी केली आहे. हदगाव येथे 60 हजारांची चोरी झाली आहे. मुखेड येथे 60 हजारांची चोरी झाली आहे. भोकर येथे एक शाळा फोडून चोरट्यांनी 42 हजार 500 ऐवज लंपास केला आहे. देगलूर आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. एकूण 7 चोरी प्रकारांमध्ये 11 लाख 18 हजार 365 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
संतोष राजाभाऊ जोशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आणि त्यांचे कुटूंबिय ब्राम्हणगल्ली माहूर येथील आपल्या घरात 24 जुलै रोजी रात्री 1 ते पहाटे 4 वाजेदरम्यान पहिल्या मजल्यावर झोपले असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घराचे गेट, दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला आणि कपाटाचे लॉकर फोडून त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा एकूण 7 लाख 19 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. माहूर पोलीसांनी हा चोरीचा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक नामदेव मद्दे अधिक तपास करीत आहेत.
गणेश राजाराम गुंडेवार हे दि.23 जुलै रोजी सकाळी 10 वाजता आपल्या बॅगमध्ये 1 लाख रुपये घेवून लातूर फाटा येथून लोहा जाण्यासाठी बसमध्ये बसले त्या बसमध्ये 20 ते 25 वयोगटाच्या मुलींनी त्यांना बसण्यासाठी जागा दिली आणि त्यांची नजर चुकवून त्यांच्या बॅगमधील 1 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. सोनखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार हंबर्डे हे अधिक तपास करीत आहेत.


गजानन दत्तात्रय चालीकवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 जुलै रोजी सायंकाळी 5 ते 5.45 या वेळेदरम्यान ते आपली माळकौठा येथील दुकान बंद करून आपल्या दुचाकी गाडीवर दुकानातील सोन्याचे दागिणे, चांदीचे दागिणे, रोख रक्कम घेवून महाटी-येळी रस्त्यावरुन जात असतांना 3 अज्ञात चोरटे दुचाकीवर आले आणि त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील 97 हजारांचा ऐवज असलेली कापडी बॅग बळजबरीने चोरून नेली आहे. मुदखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक राजू वटाणे अधिक तपास करीत आहेत.
अन्नपुर्णा सुधाकरराव देशमुख या 64 वर्षीय महिला 24 जुलै रोजी मधुकरराव रंगराव देशमुख यांच्या घराकडे पायी जात असतांना त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने तोडून नेले आहे. हदगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार हंबर्डे हे अधिक तपास करीत आहेत.
सुलोचनाबाई बालाजी कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे कर्णा ता.मुखेड येथील त्यांच्या घराचे कुलूप कोणी तरी चोरट्यांनी 23 जुलैच्या सायंकाळी 5.30 ते 24 जुलैच्या पहाटे 6 वाजे दरम्यान तोडले. घरातील लोखंडी पेटीत ठेवलेले सोने-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 59 हजार 865 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मुखेड पेालीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार गारोळे हे करीत आहेत.
सुधीर वसंतराव सुरंगळीकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा भोकर येथे मुख्याध्यापक आहेत. 20 जुलैच्या सायंकाळी 4 ते 21 जुलैच्या पहाटे 10 वाजेदरम्यान शाळेतील पहिली व सातवी वर्गाचे लॉक तोडून कोणी तरी चोरट्यांनी त्यातील एक टी.व्ही.आणि वजनकाटा असा 42 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार पांढरे हे अधिक तपास करीत आहेत.
उत्तम भारतराव धंपलवार यांची एम.एच.26 ए.पी.7229 क्रमांकाची दुचाकी गाडी 23 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास देगलूर येथून त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 25 हजार रुपये आहे. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सरोदे अधिक तपास करीत आहेत.
रामेश्र्वर हरीदास गुंडाळे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.जे.ही 15 हजार रुपये किंमतीची गाडी 23 जुलै रोजी मध्यरात्री गोदावरी हातमाग सोसायटी लातूरफाटा येथून चोरीला गेली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सुर्यवंशी हे अधिक तपास करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.