

या चोरट्यांनी परभणी, बोधन, येट्टापल्ली, निजामाबाद येथेही केल्या आहेत चोऱ्या
नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीसांकडे राहुल नावाच्या एका व्यक्तीला बंदुकीच्या धाकावर लुटून जवळपास 60 हजारांचा ऐवज लुटल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींकडून इतवारा हद्दीतील तीन घरफोड्या, एक मारहाणीचा गुन्हा उघडकीस आला आहे. सोबतच या दोघांनी परभणी येथून एक मोटारसायकल चोरली आहे. निजामाबाद जिल्ह्यातील बोधन येथून महिलेचे गंठण चोरले, येट्टापल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंठण चोरले, निजामाबाद शहरातून महिलेचे गंठण चोरले असे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. पकडलेल्या दोघांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.
इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक निर्जन स्थळी राहुल नावाच्या एका युवकाला अडवून त्यावर गोळीबार करून त्यास लुटण्यास आले होते. या प्रकरणाची माहिती काढून इतवारा पोलीसांनी सय्यद अकबर उर्फ शेरु सय्यद गफुर(35) आणि सय्यद आझम सय्यद लाल (26) दोघे रा.इसलामपुरा, इतवारा नांदेड यांना अटक केली. यातील एकाने राहुलला लुटतांना माझ्या सोबत सलीम होता अशी माहिती दिली. त्या गुन्ह्यात एक गावठी पिस्टल आणि जीवंत काडतूस तसेच 40 हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
त्यानंतर पोलीस कोठडीतील तपासात या दोघांनी गुन्हा क्रमांक 50, 81 गुन्हा क्रमांक 92 हे सर्व चोरीचे गुन्हे आणि एक मारहाणीचा गुन्हा कबुल केला. चोरीच्या गुन्ह्यातील 61 हजार रुपयांचा ऐवज इतवारा पोलीसांनी या चोरट्यांकडून जप्त केला आहे.
ही माहिती समोर आल्यानंतर न्यायालयाने या दोघांची पोलीस कोठडी वाढूवन दिली आहे. या दोन्ही चोरट्यांनी येट्टापल्ली, बोधन आणि निजामाबाद पोलीसांसमक्ष तेथे केलेले गुन्हे आपणच केल्याची कबुली सुध्दा दिली आहे. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, इतवाराचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांनी इतवाराचे पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक अरुण नांगरे, पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके, पोलीस अंमलदार गणपत पेद्दे, गंगाराम जाधव, केंद्रे, हबीब चाऊस, धीरज कोमुलवार आणि शेख सत्तार यांनी मेहनत घेतली आणि गुन्हे उघडकीस आणले यासाठी सर्वांचे कौतुक केले आहे.