नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपअधिक्षक उपविभाग सेलू जि.परभणी यांनी दीड लाख रुपये लाचेची मागणी केली आणि त्यांच्या कार्यालयातील पोलीस अंमलदाराने 10 लाख रुपये लाचेची रक्कम स्विकारली अशा आशयाचा गुन्हा सेलू पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या लाच मागणीची पडताळणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त आबासाहेब पाटील यांनी प्रसारीत केलेल्या प्रेसनोट प्रमाणे सेलू उपविभागात कार्यरत पोलीस उपअधिक्षक राजेंद्र रामकरण पाल (55) यांनी 23 मे 2021 रोजी सेलू पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका अपघाताच्या प्रकरणात मरण पावलेल्या व्यक्तीची पत्नी आणि लाच लुचपतप्रतिबंधक विभागात तक्रारदार म्हणून आलेला व्यक्ती या दोघांमधील एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती. 9 जुलै रोजी पोलीस उपअधिक्षक राजेंद्रपाल यांनी त्या तक्रारदाराला बोलावले आणि तुझी ऑडीओ क्लिप मी ऐकली आहे. या प्रकरणातून तुला बाहेर पडायचे असेल तर मला 2 कोटी रुपये द्यावे लागतील असे सांगितले. सोबतच फोनवर अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून 2 कोटीच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने लाचलुचप प्रतिबंधक विभाग मुंबई यांच्याकडे प्रत्यक्ष भेट देवून 22 जुलै रोजी तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी झाली तेंव्हा पोलीस उपअधिक्षक राजेंद्रपाल यांनी 2 कोटी रुपयांची मागणी करून 1 कोटी 50 लाख इतक्या रक्कमेची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सापळा कार्यवाहीमध्ये पोलीस उपअधिक्षक राजेंद्रपला यांचा सहकारी पोलीस अंमलदार गणेश लक्ष्मणराव चव्हाण (37) बकल नंबर 1121 नेमणूक मानवत पोलीस स्टेशन जि.परभणी सलगन पोलीस उपअधिक्षक कार्यालय सेलू याने तक्रारदाराच्या भावाकडून 10 लाख रुपयांची लाच स्विकारल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास रंगेहात पकडले आहे. मागील कांही दिवसांमध्ये मराठवाड्या ऐवढ्या मोठ्या रक्कमेची लाच स्विकारल्याप्रकरणी अटक झालेला हा पहिलाच पोलीस आहे.