नांदेड(प्रतिनिधी)-महिला पोलीसाच्या घरून साहित्य चोरणाऱ्या एकाला विमानतळ पोलीसांनी पकडल्यानंतर न्यायालयाने त्यास पोलीस कोठडीत पाठविले. विमानतळ पोलीसांनी चोरट्याकडून 18 हजार 300 रुपये रोख आणि एक दुचाकी गाडी जप्त केली आहे.
दि.19 जुलै रोजी महिला पोलीस कर्मचारी संतोषी बालाजी देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे घर सांगवी येथे आहे. या घरात त्यांनी मार्च 2021 ते जून 2021 दरम्यान प्रल्हाद चावरे आणि त्यांची पत्नी सुकेशनी चावरे यांना घरात भाडेतत्वावर राहण्यास जागा दिली. त्या दरम्यान त्यांचा जावई विजय लक्ष्मणराव पारवे आणि त्याची पत्नी प्रतिक्षा हे सुध्दा येत-जात होते. त्यांच्याकडे गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी येत असल्याने 16 जून 2021 रोजी मी त्यांना घर रिकामे करायला लावले त्यांनी माझे घर सोडतांना माझे घरगुती सामान त्यांनी नेले आणि त्यावरुन वाद झाला आणि माझ्या पर्समधील 8 हजार 300 रुपये घेवून गेल्याची तक्रार मी 18 जुलै 2021 रोजी पोलीस ठाणे विमानतळ येथे दिली.
पुन्हा 19 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता मी आणि माझा मुलगा गौरव आणि मुलगी नम्रता हे घरी असतांना विजय लक्ष्मण पारवे, सासरा प्रल्हाद चावरे, मेहुणी प्रज्ञा चावरे हे शिव्या देत माझ्या घरात घुसले आणि आमच्याविरुध्द तक्रार का दिली म्हणून वाद घातला. घरात टेबलावर ठेवलेली माझे दहा हजार रुपये असलेली आणि एक 5 ग्रॅम सोन्याची अंगठी 25 हजार रुपयांची ही पर्स विजय पारवेने बळजबरी उचलली. मी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही.
विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.डी. जाधव, पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, बाबा गजभारे, बालाजी केंद्रे आणि गंगावरे यांनी विजय लक्ष्मण पारवेला पकडले. त्याच्याकडून 18 हजार 300 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाने विजय पारवेला पोलीस कोठडीत पाठवले होते.
