

नांदेड(प्रतिनिधी)-गेले तीन दिवस पावसाने आपली हजेरी काम ठेवल्याने शहरात आणि जिल्ह्यात अनेक जागी त्रासच झाला आहे आणि पावसाच्या अतिरिक्त पर्जन्यमानामुळे सर्वसामान्य माणसाची वाट लागली आहे. सर्व भौतिक सुविधा ठप्प पडल्या आहेत. रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले आहेत अनेक लोक पडता-पडता वाचत आहेत. आज विष्णुपूरी प्रकल्पातील एकूण 6 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 2484 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
गेली तीन दिवस पाऊस कांही थांबेना, कधी जोरात तर कधी हळू अशा परिस्थितीत पाऊस येतच आहे. जिल्ह्यात सर्वच पाणी साठे तुडूंब भरले आहेत. अतिरिक्त पावसामुळे अनेक तालुक्यांना जाणाऱ्या बस गाड्या आज बंद होत्या. बऱ्याच जागी पावसाने रस्ते वाहून गेले आहेत. अनेक पुलांवरून पाणी वाहत आहे. शहरातील रस्त्यांची तर दुर्धर अवस्था झाली आहे. पाण्यामुळे खड्डा दिसत नाही आणि दुचाकी गाड्या त्या खड्यात धाडकन अडकत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणे-येणे अवघड झाले आहे. कधी, कोण, कोठे खड्यांच्या कारणामुळे रस्त्यावर खाली पडेल याचा कांही एक नेम नाही अशा परिस्थितीत होणाऱ्या दुर्देवी आवस्थेला आपल्या नशीबाचा भाग म्हणून लोक सहन करत आहेत.
विष्णुपूरी प्रकल्पात पाण्याचा साठा 353.25 मीटर झाला आहे. पाण्याची टक्केवारी 85.57 टक्के आहे. त्यामुळे प्रकल्पातील दरवाजा क्रमांक 14 दुपारी 3 वाजता उघडण्यात आला. त्यानंतर सायंकाळी 5.45 वाजता इतर पाच दरवाजे ज्यात दरवाजा क्रमांक 3, 4, 7, 11 आणि 13 हे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून 2484 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीच्या खालच्या भागात नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी येणारा पाण्याचा विसर्ग पाहता दक्ष राहण्याची गरज आहे. प्रशासन सुध्दा याबाबीवर लक्ष ठेवून आहे. कोणाला कांही समस्या आली तर त्यांनी त्वरीत प्रशासनाशी संपर्क साधून मदत घ्यावी असे प्रशासनाने सांगितले आहे.