क्राईम

विक्की ठाकूरसोबत आणखी दोन खून होणार होते ! ; बिघानीया कुटूंबातील दोन महिलांना दोन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-20 जुलै रोजी फक्त विक्की ठाकूरच नव्हे तर तीन जणांचे खून होणार होते असा खुलासा आज पोलीसांनी या प्रकरणी दोन महिलांना न्यायालयात आणल्यानंतर न्यायालयासमोर सादर केलेल्या कागदपत्रातून समोर आला. विक्की ठाकूर खून प्रकरणात बिघानीया कुटूंबातील दोन महिलांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. यातील एका महिलेला दोन लहान बालके आहेत.
दि.20 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्यासुमारास एका विशिष्ट समाजाच्या दिशेने निर्देश करणाऱ्या टोप्या घालून दोन दुचाकी गाड्यांवर पाच जण आले आणि त्यांनी गाडीपूरा भागातील ममता पान शॉप जवळ विक्की दशरथसिंह ठाकूर (32) याचा खून केला. त्यावेळी त्याच्यासोबत सुरज भगवान खिराडे (29) आणि निखिल उर्फ कालू प्रकाश मदने असे दोन युवक होते. या प्रकरणात सुरज भगवान खिराडेच्या तक्रारीवरुन इतवारा पोलीसांनी गुन्हा क्रमांक 176/2021 दाखल केला. या तक्रारीमध्ये त्या ठिकाणी आलेल्या पाच जणांची नावे नितीन जगदीश बिघानीया, दिगंबर काकडे, मुंजाजी उर्फ गब्या धोंगडे, लक्की मोरे पाटील, गंगाधर अशोक भोकरे अशी आहेत. सोबतच या खूनाचा कट रचण्यामध्ये सध्या तुरूंगात असलेला कैलास जगदीश बिघानीया, त्याची बहिण ज्योती जगदीश बिघानीया आणि भावजई अंजली नितीन बिघानीया अशी तीन जणांची नावे आहेत. एकूण आठ आरोपींविरुध्द ही तक्रार दाखल झाली आहे.
या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार साहेबराव नरवाडे यांच्यासह महिला आरोपी अंजली नितीन बिघानीया, ज्योती जगदीश बिघानीया यांना पोलीस उपनिरिक्षक शालीनी गजभारे , इतर महिला पोलीस अंमलदार आणि सोबत सहाय्यक पोलीस निरिक्षक बाळू गिते, पोलीस अंमलदार गौतम कांबळे, दिगंबर पवार, कासार आदींनी न्यायालयात हजर केले.
न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रानुसार सुरज खिराडेने दिलेल्या तक्रारीत असे लिहिले आहे की, सायंकाळी 7.30 वाजता मी, कालू मदने आणि विक्की ठाकूर हे सोबत होतो. त्यावेळी लक्की मोरे आम्हाला पाहुन एका गल्लीत पळाला. आम्ही तिघांनी त्यावर चर्चा केली आणि नंतर कालू मदने आपल्या घरात गेला आणि तेवढ्यातच दोन दुचाकी गाड्यांवर पाच जण आले आणि त्यांनी आमच्यावर गोळीबार केला. कालू मदने आम्हाला ओरडून घरात येण्यासाठी सांगत होता पण आम्ही भिवून दुसरीकडे पळालो.त्यावेळी पळतांना विक्की ठाकूर खाली पडला तेंव्हा त्यावर नितीन बिघानीया आणि गंगाराम भोकरे यांनी गोळ्या चालविल्या तसेच दिगंबर काकडे, मुंजाजी धोंगडे उर्फ गब्या आणि लक्की मोरे या तिघांनी विक्की ठाकूरवर तलवारीने हल्ला केला आणि या हल्यात विक्की ठाकूरचा मृत्यू झाला.
सहाय्यक सरकारी वकील मोहम्मद रजियोद्दीन यांनी बाजू मांडतांना या गुन्ह्यातील कट रचण्यामध्ये अंजली आणि ज्योती बिघानीया यांचा समावेश आहे. याचा संदर्भ सांगतांना दि.2 जुलै रोजी एक वर्षापुर्वी विक्की ठाकूरचा मित्र विक्की चव्हाणचा खून झाला होता. त्या खून प्रकरणाची तारीख होती आणि त्या दिवशी या महिलांनी विक्की ठाकूरला न्यायालयात साक्ष न देण्यासाठी धमकी दिली होती. यावर अंजली आणि ज्योती बिघानीया यांचे वकील ऍड.मिलिंद एकताटे यांनी इतर पाच आरोपींना पकडण्यासाठी दबाव तंत्र वापरता यावा म्हणूनच या महिलांची नावे गुन्ह्यात गोवली आहेत. अंजलीकडे दोन मुले आहेेत. अशा परिस्थितीत यांचा त्या कटाशी कांही संबंध आज सांगता येणार नाही. सोबतच मारेकऱ्यांनी वापरलेल्या विशिष्ट टोप्या म्हणजे त्या त्या समाजाचे व्यक्ती नसतील असे आज म्हणता येणार नाही असा युक्तीवाद मांडला. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश प्रविण कुलकर्णी यांनी अंजली आणि ज्योती बिघानीयाला दोन दिवस अर्थात 25 जुलै 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार नितीन बिघानीयाने आपला एक फोटो बंदुकीसह फेसबुकवर प्रसिध्द करून विक्की, काल्या आणि सुरज्या या तिघांना संपवून टाकणार असल्याची धमकी प्रसारीत केली होती. ही बाब पोलीसांनी न्यायालयातपण सांगितली. त्यावेळी विक्की ठाकूर आणि त्याच्या इतर मित्रांनी मिळून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या संदर्भाची माहिती दिली होती. पण कार्यवाही काहीच झाली नाही आणि अखेर विक्की ठाकूरचा खून झाला. बिघानीयाचे वकील ऍड. मिलिंद एकताटे यांनी कैलाश बिघानीया गॅंगच्या विरुध्द सुरज खिराडेने दिलेली तक्रार पुर्वगृहदुशीत आहे असेही सांगितले होते. यावरून नांदेड जिल्ह्यात गॅंग (टोळ्या) कार्यरत आहेत हे स्पष्ट होते. टोळ्या कार्यरत असतांना पोलीस काय करत आहेत हा प्रश्न सुध्दा उपस्थित होत आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com