क्राईम

विक्की ठाकूर खून प्रकरणात दोन महिलांसह आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल

विशिष्ट टोपी परिधान करून मारेकऱ्यांनी समाजात सुध्दा अशांतता माजविण्याचा प्रयत्न केला होता
नांदेड(प्रतिनिधी)-विक्की ठाकूरचा खून करतांना दोन समाजात बेबनाव करण्याचा मारेकऱ्यांचा प्रयत्न कांही तासातच उलटला. विक्की ठाकूर खून प्रकरणात दोन महिलांसह आठ मारेकऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीने तुरूंगातून या खूनाचा सर्व कट रचला असे एफआयआरवरून दिसते. मारेकऱ्यांना शोधण्यासाठी पोलीसांचे तीन पथक विविध गावांमध्ये पोहचले आहेत.
काल दि.20 जुलै रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास विक्की दशरथसिंह ठाकूर (32) यास दोन दुचाकीवर आलेल्या पाच मारेकऱ्यांनी गाडीपुरा भागातील ममता पान ते गजेंद्र ठाकूर यांच्या घराच्या दरम्यान गोळ्या झाडून खून केला. तो खाली पडल्यावर त्याच्या शरिरावर तलवारीने अनेक वार केले आणि मारेकरी पळून गेले. विक्की ठाकूरसोबत त्यावेळी सुरज भगवान खिराडे (29) रा.असर्जन हा युवकपण होता. आपल्या मित्रावर झालेला हल्ला पाहुन तो गल्लीबोळाने पळाला पळता-पळता अनेक जागी पडला आणि जखमी झाला. त्यानेच या घटनेची तक्रार पोलीस ठाणे इतवारा येथे दिली आहे. या तक्रारीत असे नमुद आहे की, दोन महिला आणि कैलास बिघानीया वगळता इतर पाच जण दोन दुचाकीवर आले होते आणि त्यांनी दोन बंदुकातून विक्की ठाकूरवर हल्ला केला होता. विक्की चव्हाण खून प्रकरणाच्या गुन्ह्यात साक्ष देवू नये म्हणून विक्की ठाकूरचा खून करण्यात आला असे या तक्रारीत लिहिले आहे.
या तक्रारीनुसार इतवारा पोलीसांनी गुन्हा क्रमांक 176/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 143, 147, 148, 149, 302, 307, 120(ब), 294 आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4,3/25 आणि 27 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास इतवाराचे पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्याकडे दिला आहे. या ठिकाणी प्रत्यक्षात घटना पाहणाऱ्या आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे मारेकरी पाहिले असता त्यांनी एका विशिष्ट समाजाची ओळख असलेली टोपी प्रत्येकाने धारण केली होती. यावरून विक्की ठाकूरचा खून करून पेहरावाच्या आधारावर दोन समाजात वितुष्ट तयार होईल अशी कृती सुध्दा मारेकऱ्यांनी केली होती. पण सुरज खिराडेने हा डाव उधळून लावला. त्यामुळे समाजाची शांताता टिकली.
तक्रारीत लिहिल्याप्रमाणे नितीन जगदीश बिघानीया, दिगंबर काकडे, मुंजाजी उर्फ गब्या धोंगडे, लक्की मोरे पाटील, गंगाधर अशोक भोकरे, कैलास जगदीश बिघानीया, अंजली नितीन बिघानीया, नितीन बिघानीयाची बहिण ज्योती बिघानीया अशा आठ जणांची नावे आहेत. या आठ जणांपैकी कैलास जगदीश बिघानीया हा सध्या विक्की चव्हाण खून प्रकरणात तुरूंगात आहे. प्राप्त माहितीनुसार टेलीफोनवरील बोलणे, त्याचे रेकॉर्डींग या आधारावर विक्की ठाकूरचा खून करण्यात महिलांचापण कटात सहभाग आहे असे दिसते. कैलास बिघानीयाने तुरूंगात राहुन या खूनाचे खलबत रचले.
ऑगस्ट 2020 मध्ये विक्की ठाकूरचा मित्र विक्की चव्हाणचा खून करण्यात आला होता. विक्की चव्हाण मरण पावल्यानंतर त्याचे प्रेत मारेकऱ्यांनी गावभर फिरवले होते आणि जागोजागी त्याच्यावर तलवारीने वार केले होते अशी त्या खूनाची कथा आहे. कैलास बिघानीयासह जवळपास 12 ते 14 जण विक्की चव्हाणच्या खून प्रकरणात सध्या तुरूंगात आहेत. दोन गॅंगमध्ये सुरू झालेला हा प्रकार कोठे तरी पुर्णविराम लावण्याची जबाबदारी पोलीस विभागाची आहे. पोलीसांनी आपल्या अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचाऱ्यांची तीन पथके मारेकऱ्यांना शोधण्यासाठी विविध गावांना पाठवली आहेत. दररोजच या अशा प्रकारच्या कृती करणाऱ्या लोकांवर वचक ठेवला तर असे घडणार नाही अशी चर्चा जनता करत आहे. विक्की चव्हाण नंतर त्याचा जवळचा मित्र असेलेल्या विक्की ठाकूरचा खून करून बिघानीया नांदेडचे माफिया होवू इच्छीतात असे या प्रकरणावरून दिसते. त्याला चाप लावणार कोण?
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.