नांदेड(प्रतिनिधी)-मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात 17 जुलै रोजी दाखल झालेल्या दोषारोप पत्राचा निकाल 48 तासाताच्या आत पुर्ण झाला. या प्रकरणातील मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला मुख्य न्यायदंडाधिकारी योगेशकुमार राहगंडाळे यांनी 20 दिवस कैदेची शिक्षा ठोठावली.
दि.1 जुलै रोजी गुरूद्वारा गेट क्रमांक 2 समोर चरणदिपसिंघ बंड यांनी उभी केलेली त्यांची दुचाकी गाडी चोरीला गेली. या बाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 211/2021 दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार प्रकाश राठोड आणि त्यांचे सहकारी अंगद राऊत यांनी केला. याबाबत मोटारसायकल चोरी करणारा आरोपी परमजितसिंघ सतनामसिंघ (29) यास अटक करण्यात आली. हा व्यक्ती रा.कोहाली ता.अरनाळा जि.अमृतसर पंजाब येथील आहे. पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात प्रकाश राठोड यांनी परमजितसिंघ विरुध्द 17 जुलै रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर न्यायालयाने आरसीसी क्रमांक 726/2021 अशी खटल्याची नोंद केली. 19 जुलै रोजी मोटारसायकल चोरणारा परमजिसिंघ सतनामसिंघ याने न्यायालयासमक्ष दोषारोप तयार झाला तेंव्हा आपण गुन्हा केल्याचे कबुल केले. न्यायालायने त्यास 20 दिवस कैदेची शिक्षा दिली आहे. दोषारोपपत्राचा खटला तयार झाल्यानंतर 48 तासात या खटल्याचा निकाल लागला आहे. न्यायालयातील वजिराबादचे पोलीस अंमलदार बालाजी लामतुरे आणि प्रदिप कांबळे यांनी सुध्दा या खटल्याचा निकाल लागण्यासाठी प्रयत्न केले.
