

नांदेड(प्रतिनिधी)-वाहतुक शाखेतील एका पोलीस अंमलदाराने पोलीस उपअधिक्षक देशमुख यांच्या नावे वाहतुक शाखा क्रमांक 1 चा पोलीस दैनंदिनीमध्ये नोंद केली आहे. पोलीस उपअधिक्षकांनी वाईट बोलून सार्वजनिक ठिकाणी अपमान केला असे या नोंदीत लिहिले आहे. सन 2019 मध्ये वाहतुक शाखेची विभागणी झाली. त्या आदेशात वाहतुक क्रमांक शाखा क्रमांक 1 आणि 2 वर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार पोलीस उपअधिक्षक मुख्यालय यांना देण्यात आलेले आहेत.
दि.15 जुलै रोजी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने इंधन दरवाढी विरोधात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे सुनियोजन व्हावे म्हणून पोलीस अधिक्षकांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तो बंदोबस्त अटोपून आल्यानंतर वाहतुक शाखा क्रमांक 1 मधील पोलीस अंमलदार पांगरेकर बकल नंबर 2456 यांनी वाहतुक शाखेच्या दैनंदिनीमध्ये क्रमांक 14 वर 15.10 वाजता (दुपारी 3.10 वाजता) नोंद केली आहे. या नोंदमध्ये पांगरेकर असे लिहितात की, मी शहर वाहतुक शाखेचा बंदोबस्त करून वाहतुक शाखेच्या कार्यालयात परत आलो मी एका ठिकाणी रॅलीची बंदोबस्त करत असतांना डीवायएसपी देशमुख साहेब माझ्या जवळ आले आणि कांही कारण नसतांना रागात आले व मला रस्त्यावरील येणाऱ्या – जाणाऱ्या नागरीकांसमोर वाईट बोलून अपमानीत केले. म्हणून नोंद असे लिहुन पोलीस अंमलदार पांगरेकर यांनी आपली स्वाक्षरी दैनंदिनीवर केली आहे.
नांदेड वाहतुक शाखेच्या 1 आणि 2 अशा शाखा 11 सप्टेंबर 2019 रोजी तयार करण्यात आल्या. त्यात वाहतुक शाखा क्रमांक 1 ची हद्द 4 पोलीस ठाण्यांची आहे. तर वाहतुक शाखा क्रमांक 2 ची हद्द 3 पोलीस ठाण्यांची आहे. त्यानुसार वाहतुक शाखा दोन विभागाचे कामकाज सुरू आहे. हा आदेश तत्कालीन पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी काढला होता. या आदेशाची एक प्रत पोलीस उपअधिक्षक मुख्यालय नांदेड यांना देण्यात आली होती आणि त्यानुसार शहर वाहतूक शाखेच्या दोन्ही विभागांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार पोलीस उपअधिक्षक मुख्यालय यांना प्रदान करण्यात आले होते. या शाखामधील प्रशासकीय बाबींची तपासणी, पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांच्या कामाजावर देखरेख ठेवून वाहतुक शाखेच्या कामावर नियंत्रण ठेवावे असे आदेश पोलीस उपअधिक्षक मुख्यालय यांना देण्यात आलेले आहेत.
15 जुलै रोजी घडलेला हा वाईट बोलण्याचा प्रकार नक्कीच दुर्देवी आहे. आपल्या जीवनात भरपूर कांही अनुभव घेवून आज पोलीस उपअधिक्षक पदावर नांदेड शहरात कार्यरत असणाऱ्या डीवायएसपी देशमुख यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर वाईट बोलून त्याचा अपमान करणे या बाबत कोण निर्णय घेईल या प्रश्नाचे उत्तर मात्र सापडले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांमध्ये दैनंदिनीमधील नोंदीला खुप मोठे महत्व आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा आपले निकाल देतांना दैनंदिनीमधील नोंदीचा उल्लेख भरपूर मोठ्या शब्दात केलेला आहे. एखादा पोलीस कर्मचारी आपले काम करत असतांना त्याची चुक झाली असेल, त्याने आपल्या कर्तव्यात कसूर केला असेल तर त्याला बोलण्याचा अधिकार प्रशासकीय स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे. पण वाहतुक शाखेच्या नियंत्रणाचे अधिकार पोलीस उपअधिक्षक मुख्यालय यांना आहेत हे सुध्दा या नोंदीच्या संदर्भाने महत्व पुर्ण आहे.